ममता बॅनर्जी यांच्या सहकाऱयाचा दावा ः तृणमूलला करत आहेत मतदान
भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून यंदा ममता बॅनर्जी यांच्याजागी ऊर्जामंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांना तृणमूल काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. 77 वर्षीय दिग्गज नेते शोभनदेव प्रख्यात बॉक्सर राहिले आहेत. ते कोलकात्यातील भद्रलोक समुदायाशी संबंधित आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात कठोर शब्दांचा वापर न करणाऱया नेत्यांमध्ये शोभनदेव यांचा समावेश आहे. सभ्य निवडणूक प्रचारावर त्यांचा विश्वास आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांना उद्देशून केलेली ‘दीदी ओ दीदी’ टिप्पणीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान ज्याप्रकारे आमच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत, तो प्रकार चुकीचा आहे. आमच्या महिला मतदार यामुळे नाराज आहेत. त्या देशातील एकमात्र महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अशाप्रकारच्या शब्दाचा वापर केला जाऊ नये. मोदी आणि अमित शाह हे देशाचे महत्त्वाचे मंत्री असल्याने त्यांनी अशाप्रकारच्या भाषेचा वापर करू नये असे शोभनदेव यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान दानव आणि दुर्योधन यासारख्या टिप्पणींचा वापर केला आहे. दानव एक वाईट शब्द नाही, याचा वापर साहित्यातही करण्यात येतो. पण पंतप्रधान ज्याप्रकारची भाषा वापरत आहेत, त्याची विपरित प्रतिक्रिया देखील असते असा दावा शोभनदेव यांनी केला आहे. शोभनदेव यांच्यासाठी ममता बॅनर्जी यांनी रविवारी रोड शो केला होता. तृणमूल काँग्रेसला भवानीपूर आणि नंदीग्राम दोन्ही ठिकाणी विजय मिळणार असल्याचा दावा शोभनदेव यांनी केला आहे.
विजय निश्चित
भवानीपूर हा मागील 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ राहिला आहे. याचमुळे मला अत्यंत मजबुतीने लढावे लागणार आहे. या मतदारसंघात मी निश्चितच जिंकणार आहे. ममतांनी या मतदारसंघात 10 वर्षांपर्यंत सेवा केल्याने माझा विजय सोपा ठरला आहे. हा मतदारसंघ माझे जन्मस्थान देखील असल्याचे विधान शोभनदेव यांनी केले आहे. मागील 59 वर्षांपासून शोभनदेव राजकारणात कार्यरत आहेत. 1991 पासून आतापर्यंत त्यांनी 7 निवडणुकांमध्ये सातत्याने विजय मिळविला आहे. 1998 मध्ये दक्षिण कोलकात्यातील रासबिहारी मतदारसंघातून विजयी होत ते तृणमूलचे पहिले आमदार ठरले होते.
भवानीपूरमधील आव्हान
रासबिहारीप्रमाणेच भवानीपूरबद्धलही मला आत्मियता आहे. भारतीय कनिष्ठ बॉक्सर्सच्या संघाचा मी कर्णधार राहिलो आहे. माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण भवानीपूरमध्येच झाले आहे. ममता दीदी संघर्षातून निघालेल्या नेत्या आहेत. त्यांनी नंदीग्राममधून स्वतःचा संघर्ष सुरू केला, याचमुळे तेथील लोकांच्या विनंतीनुसार त्यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तृणमूलने भवानीपूर जिंकण्यासाठी स्वतःचा सर्वश्रेष्ठ कॉमेड आणि कार्यकर्ता निवडला असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
मिनी इंडिया
भवानीपूरला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. गुजराती आणि पंजाबी मतदारांमुळे येथे भाजपला विजयाची अपेक्षा आहे. हा मतदारसंघ सर्व धर्म आणि जातींसह एक मिनी इंडिया आहे. सर्व मजूर आणि स्वीपर पूर्वी माझ्या संघटनेत होते आणि माझे समर्थक होते. मी स्थानिक गुजरातींना भेटलो आहे. त्यांचाही पाठिंबा प्राप्त असल्याचा दावा शोभनदेव यांनी केला आहे.