हृदयविकाराचा झटका : प्रकृती स्थीर
प्रतिनिधी/ फोंडा
मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
दीपक ढवळीकर यांना मंगळवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने फोंडा येथील सावईकर नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टर्सनी प्राथमिक तपासणी करुन गोमेकॉत नेण्याचा सल्ला दिला. सायंकाळी 6 वा. त्यांना गोमेकॉतील कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले. डॉ. मंजुनाथ देसाई व डॉ. शिरीष बोरकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. मात्र अँजीओग्राफी करण्यासंबंधीचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. महिन्याभरापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मणिपाल इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या बांदोडा येथील निवासस्थानी ते विश्रांती घेत होते.
दरम्यान त्यांचे बंधू व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दीपक ढवळीकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना, त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती स्थीर असून काळजी करण्याचे कुठलेच कारण नसल्याचे एका संदेशात म्हटले आहे.