वारसॉ / वृत्तसंस्था
भारताचा ऑलिम्पिक पात्र मल्ल दीपक पुनियाने पोलंड ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. डाव्या हाताची दुखापत चिघळू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्याने हा निर्णय घेतला. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी ही शेवटची मानांकन स्पर्धा आहे. पुनिया बाहेर पडल्यानंतर या स्पर्धेत फक्त 3 भारतीय मल्लांचा सहभाग असेल, हे निश्चित झाले आहे.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दीपक पुनिया या स्पर्धेत 86 किलोग्रॅम वजनगटातून मॅटवर उतरणार होता. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत त्याचा मुकाबला अमेरिकेच्या झाहिद व्हॅलेन्सियाविरुद्ध होणार होता. मात्र, त्याने येथे आपण खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले. 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकणाऱया दीपक पुनियाला वारसॉ येथे रवाना होण्यापूर्वी दोन दिवस आधी डाव्या हाताची दुखापत झाल्याचे समजते.
‘दुखापत आणखी चिघळू नये, हा त्याचा उद्देश आहे. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यावेळी कशी परिस्थिती असेल, त्यावर मी निर्णय घेईन, असे त्याने यापूर्वीच कळवले होते. वारसॉ येथे पोहोचल्यानंतर स्पर्धेत उतरणे धोक्याचे ठरु शकते, हे लक्षात आल्यानंतर त्याने आपण सहभागी होणार नसल्याचे कळवले’, असे भारतीय पथकातील एका सूत्राने सांगितले.
भारतीय कुस्ती फेडरेशनने देखील आपण दीपक पुनियाला स्वतः निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले होते, असे स्पष्ट केले. ‘आम्ही ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन करणाऱया कोणत्याही मल्लावर दडपण टाकू इच्छित नाही. ऑलिम्पिक अगदी उंबरठय़ावर आहे आणि या क्षणी धोका पत्करण्यात काहीच हशील नाही’, असे भारतीय कुस्ती फेडरेशनचे साहायक सचिव विनोद तोमर यांनी स्पष्ट केले.
दीपक पुनिया दि. 5 जुलैपर्यंत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी पथकातच थांबणार आहे. पोलंड फेडरेशनच्या संयुक्त विद्यमान सदर शिबिर आयोजित केले गेले आहे. भारताच्या ऑलिम्पिक पात्र मल्लांना प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये उतरण्यापूर्वी आणखी सराव मिळावा, यासाठी तुर्की, रोमानिया व रशिया फेडरेशनच्या विद्यमाने प्रशिक्षण शिबिरे घेण्याचा भारतीय कुस्ती फेडरेशनचा प्रयत्न आहे.
ऑलिम्पिकमध्ये 57 किलोग्रॅम वजनगटासाठी पात्र ठरलेला रवी दाहिया या स्पर्धेत 61 किलोग्रॅम वजनगटात उतरणार आहे. विनेश फोगट (53 किलोग्रॅम वजनगट), अंशू मलिक (57 किलो) हे शुक्रवारी महिला गटात सलामीच्या लढतीसाठी उतरतील.
भारताचा आघाडीचा मल्ल बजरंग पुनियाने देखील पोलंडमधील या स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी रशियात प्रशिक्षण घेण्याला त्याने अधिक पसंती दिली. सीमा बिस्ला (50 किलोग्रॅम) व सोनम मलिक (62 किलोग्रॅम) यांनीही वारसॉला न जाण्याचा निर्णय घेतला. सीमा व सोनम सध्या दुखापतीतून सावरत आहेत. सुमित मलिकला (125 किलो गट) उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने जागतिक संघटनेने निलंबित केले आहे. सोफियातील स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीत तो दोषी आढळून आला.