वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
भारताचे तिरंदाजीतील दाम्पत्य अतानू दास व दीपिका कुमारी यांनी मिळविलेल्या दोन सुवर्णपदकांच्या बळावर भारताने विश्व चषक स्टेज 1 तिरंदाजी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना एकूण तीन सुवर्ण व एक कांस्यपदकाची कमाई केली.
माजी अग्रमानांकित दीपिकाने विश्व चषक स्पर्धेतील वैयक्तिक तिसरे सुवर्ण मिळविताना सांघिक सुवर्णपदक पटकावण्यासही साहय़ केले. तिचा पती अतानू दासने विश्व चषक स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक पटकावताना पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्हचे जेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे दोघेही या मोसमात होणाऱया विश्व चषक फायनल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ‘आम्ही एकत्र प्रवास करतो, ट्रेनिंग घेतो, स्पर्धेत खेळतो आणि जिंकतोही एकत्रच,’ अशा भावना दासने नंतर व्यक्त केल्या. गेल्या वर्षी जूनमध्ये दास दीपिकाशी विवाहबद्ध झाला आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडीची पूर्ण जाणीव आहे, असेही तो म्हणाला.
रिकर्व्ह तिरंदाजांनी विश्व चषकात नोंदवलेली भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यांनी दोन वैयक्तिक व एक सांघिक सुवर्णपदक पटकावले. सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. यापूर्वी 2009 मध्ये भारताच्या जयंत तालुकदारने क्रोएशियात झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्हमध्ये सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर अतानू दासनेच अशी कामगिरी केली आहे.
महिला त्रिकुट दीपिका, अंकिता भगत, कोमलिका बारी यांनी सात वर्षांनंतर भारताला पहिले सांघिक सुवर्ण मिळवून दिले. त्यांनी मेक्सिको संघावर 5-4 (27-26) अशी शूटऑफमध्ये मात केली. अतानू दास व अंकिता भगत यांनी अमेरिकेच्या अग्रमानांकित जोडीला 6-2 असा धक्का देत मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळविले. यानंतर वैयक्तिक विभागात दीपिका व दास यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पटकावले. तिसरे मानांकन मिळालेल्या दीपिकाने चुरशीच्या झालेल्या शूटऑफमध्ये अमेरिकेच्या आठव्या मानांकित मॅकेन्झी ब्राऊनचा 6-5 (9-9) असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने मेक्सिकोच्या अलेजान्ड्रा व्हॅलेन्सिय्नाला 7-3 असे हरविले होते. विश्व चषक टप्प्यातील दीपिकाने मिळविलेले हे तिसरे सुवर्ण आहे. सॉल्ट लेक सिटी येथे तिने 2018 मध्ये याआधीचे सुवर्ण मिळविले होते.
अतानू दासनेही सर्वोत्तम प्रदर्शन करीत स्पेनच्या डॅनियल कॅस्ट्रोवर 6-4 अशा विजयासह सुवर्ण पटकावले. यापूर्वी 2016 अंटाल्या स्पर्धेत त्याने चौथे स्थान मिळवित सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. त्यावेळी त्याला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. कॅस्ट्रोविरुद्ध तीन सेट्सनी पिछाडीवर पडल्यानंतर दासने कामगिरी उंचावत कॅस्ट्रोला मागे टाकत जेतेपद मिळविले. ‘माझे हे पहिलेच अजिंक्यपद असून अनेक वर्षे केलेल्या परिश्रमाचेच हे फळ आहे. मी खूप आनंदित आहे,’ असे दास म्हणाला. दास आता दुसऱयांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे.