तिरंदाजी विश्व चषक तिसऱया टप्प्यात दीपिकाची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीने येथे झालेल्या विश्व चषक स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक करीत पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे.
यापूर्वी 2012 मध्ये तिने पहिल्यांदा अग्रस्थान मिळविले होते. रविवारी येथे झालेल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दीपिकाने रिकर्व्हच्या तीन प्रकारात सुवर्णपदके पटकावली. महिलांच्या सांघिक रिकर्व्ह, मिश्र दुहेरी रिकर्व्ह आणि वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात तिने ही पदके मिळविली. ‘तिच्या या कामगिरीमुळे महिलांच्या जागतिक क्रमवारीत ती आता पहिल्या स्थानावर पोहोचेल,’ असे विश्व तिरंदाजी संघटनेने ट्विटच्या माध्यमातून रविवारी म्हटले होते. दीपिकाने अंकिता भगत व कोमलिका बारी यांच्यासमवेत मेक्सिको संघाला हरवून महिलांच्या सांघिक रिकर्व्हचे सुवर्ण मिळविले. त्यानंतर तिने पती अतानू दाससमवेत मिश्र सांघिक रिकर्व्हमध्ये नेदरलँड्सच्या जोडीचा 5-3 असा पराभव करून सुवर्ण जिंकले. रांचीची रहिवासी असलेल्या दीपिकाने त्यानंतर वैयक्तिक रिकर्व्हमध्ये रशियाच्या 17 व्या मानांकित इलेना ओसिपोव्हाचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित तिसरे सुवर्ण मिळवून हॅट्ट्रिक साधली. तिचे हे विश्व चषक स्पर्धेतील या प्रकारातील एकूण चौथे सुवर्णपदक आहे. तिने आतापर्यंत भाग घेतलेल्या विश्व चषक स्पर्धेत 9 सुवर्ण, 12 रौप्य व 7 कांस्यपदके पटकावली आहेत.
‘विश्व चषक स्पर्धेत सर्व तीनही सुवर्णपदके जिंकण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. याचा मला आनंदच आहे, मात्र अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आगामी काळात होणार असल्याने मला कामगिरीत आणखी सुधारणाही करावी लागणार आहे,’ असे दीपिकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. महिला तिरंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळविणारी दीपिका ही डोला बॅनर्जीनंतरची दुसरी भारतीय तिरंदाज आहे. तिने जून 2012 मध्ये पहिल्यांदाच या स्थानावर झेप घेतली होती. त्यावेळी तिने तुर्कीमधील अंटाल्या येथे झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्पर्धेत तिने वैयक्तिक रिकर्व्हमध्ये पहिल्यांदा सुवर्ण मिळविले होते. पुढील महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव महिला स्पर्धक आहे.