ऑनलाईन टीम / मुंबई
अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी दीपिका सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या दिग्दर्शकावर संहिताचोरीचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. परंतु न्यायालयाने चित्रपटाला प्रदर्शनाची संमती दिली.
यात आणखी अडचणीची वाढ झाली. ती म्हणजे यानंतर दीपिकाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला होता. तिने हल्ला पीडित विद्यार्थ्यांच्या बाजूने मते मांडली होती. परिणामी तिच्या मतांशी सहमत नसलेल्यांनी ‘छपाक’ला प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दीपिकाला दिली होती. तसेच सोशल मीडियावर #boycottchappak हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला होता. परंतु या सर्व अडचणींतून बाहेर पडून अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद ही मिळत आहे.