प्रतिनिधी/ म्हसवड
नागरीक, व्यापारी, व्यावसायिक छोटे-मोठे दुकानदारांनी कोव्हीड 19च्या नियमाचे पालन करुन त्रिसूत्रीचा वापर टाळणाऱयांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, मालक व कामगारांकडे असणे आवश्यक आहे. ग्राहकांना दुकानदारांनी प्रमाणपत्राची सक्ती करावी, तरच दुकानाचा माल द्यावा. दुकानदार व कामगारांनी पंधरा दिवसाला कोव्हीड टेस्ट करुन घ्यावी, ज्यांनी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांनी त्वरीत घ्यावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपविभाग पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी म्हसवड पोलीस ठाण्यातील बैठकीत दिला.
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या संदर्भात म्हसवड व परिसरातील नागरिक कोणती काळजी घ्यावी, याविषयी शासनाकडून आलेल्या सुचना व नियमावलीची माहिती नागरिकांना कळावी, यासाठी म्हसवड पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकळे, पीएसआय विशाल भंडारे, परिसरातील पोलीस पाटील, सरपंच तसेच म्हसवड शहरातील माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युवराज सुर्यवंशी, परेश व्होरा, बंडू मोडासे, संजय टकणे, अजितकुमार व्होरा, नितीन मोडासे, चैतन्य फडतरे, नगरसेवक दादासाहेब नामदे, दादा कलढोणे, मयुर गाडेसह शेकडो व्यापारी उपस्थित होते.
यावेळी सपोनि बाजीराव ढेकळे म्हणाले, शासनाकडून आलेले कोव्हीडच्या नियमाचे पालन प्रत्येक नागरीक, वाहनधारक, व्यावसायिक, व्यापारी, फळ विक्रेते, दुकानदार व ग्राहकांनी काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कारवाई करावी लागले. नवीन नियमावलीची कडक अंमलबजावणी सुरु आहे.
सध्या सर्वत्र चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. आमचे कर्मचारी त्याचे काम करत आहेत. परंतु अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सर्व गावात ते पोहचू शकत नाहीत, त्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवकांनी आपआपल्या गावातील ग्रामसुरक्षादल कार्यरत करुन होणाऱया चोऱयांवर आळा घालण्यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन डिवायएसपी निलेश देशमुख यांनी केले.