मी सर्व व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे- सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब
नगराध्यक्ष, मुख्याधिकार्यांची व्यापारी वर्गाने घेतली भेट
सावंतवाडी / प्रतिनिधी-
मार्च महिन्यापासून आमची दुकाने बंद आहेत. आम्हाला आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उभा आहे. तसेच दुकानाचे भाडे लाईट बिल भरायचे कोठून? आम्ही आता आमच्या पोटापाण्यासाठी आम्ही दुकाने सुरू करत असताना पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करते आहे ही कारवाई बंद करा, आम्हाला रीतसर दुकाने उघडण्याची परवानगी द्या, नाहीतर आमची लाईट बिल दुकानाचे भाडे आणि आमच्या पोटापाण्याचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा अशी आर्त विनवणी सावंतवाडीतील सर्व दुकानदार – व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला भेट देत नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी मी सर्व व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे तुमच्या व्यथा मला माहित आहेत काय करायचं ते धोरण ठरवू असे आश्वासन दिले. तर मुख्याधिकारी जावडेकर यांनी सर्व दुकानदार व्यापारी जर rt-pcr टेस्ट करत असतील तर त्यांची सर्व दुकाने उघडण्याबाबत आम्ही सकारात्मक विचार करू व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही असे सांगितले. अप्रत्यक्षरीत्या जावडेकर यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना rt-pcr टेस्ट करण्याचे सूचना केल्या आहेत. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर नगरसेवक मनोज नाईक उपस्थित होते. यावेळी मिठाई व्यापारी दुकानदार बंटी पुरोहित यांनी उद्या सर्व दुकानदारांची सरसकट लसीकरण मोहीम राबवा आमचे दुकानदार व्यापारी सध्या आर्थिक विवंचनेत आहेत त्याचा तरी थोडाफार विचार करा आणि आम्हा दुकानदारांना कोरोना संरक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवावी असे मागणी केली.