मुंबई
: मुंबईत कोरोनाचा फैलाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यातच सरकारने अडीच महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही बाबी शिथिल करून शुक्रवारपासून मुंबईत सम-विषम तारखेप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंसह इतर दुकानेही उघडण्यास व व्यापार करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सकाळपासून शहर व उपनगरात काही भागात पालिकेने आखून दिलेल्या नियम व अटीशर्तीनुसारच इलेक्ट्रिक, कपडे, भांडीकुंडी, छत्री, रेनकोट, प्लास्टिक, इतर साधने यांची दुकाने कमी-अधिक प्रमाणात उघडण्यात आली होती. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती मुंबईकरांपर्यंत व दुकानदार, व्यापारी यांच्यापर्यंत नीटपणे न पोहोचल्याने ग्राहकांचाही पहिल्याच दिवशी काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अधिक प्रमाणात प्रतिसाद लाभला. नागरिकांनी पावसाळी सामनाची म्हणजे छत्री, रेनकोट, ताडपत्री आदींची खरेदी केली तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी चांगलीच गर्दी काही ठिकाणी पाहायला मिळाली. शाळा उशिराने सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण होते. आता नागरिकांना बाजारपेठा खुल्या झाल्या असल्याने आणि दुकानदारांनाही त्यांचे दुकानाचे शटर ओपन झाल्याने अर्थकारणाचा मार्ग खुला झाला आहे. दुकानात काम करणाऱया कर्मचाऱयांनाही रोजगाराची पुन्हा एकदा संधी लाभली आहे.
मात्र, जेव्हा नियमितपणे ही दुकाने व्यवस्थित सुरू होतील तेव्हाच त्याचा लाभ ग्राहकांना आणि व्यापारी बांधवांना होणार आहे. मात्र, कोरोनाने मुंबईकरांसह व्यापारी वर्गाची कंबर तोडून टाकली आहे. कोरोनाच्या फैलावाचा, दहशतीचा परिणाम आजही दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सुरू करण्यात अद्याप अडचणी आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना तेथील कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.
मॉल्स, सलून, उपहारगफह बंदच
पालिकेने दुकानदारांना दिलेल्या परवानगीमधून अधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या मॉल्स, ब्युटी पार्लर, सलून, मसाज सेंटर, उपहारगफह यांना अद्यापही कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. उपहारगफहाला खाद्यपदार्थ बनवून ते घरपोच विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे.
…तर उपहारगफहांना विभागातील सहाय्यक आयुक्तांना परवानगीचे अधिकार
पालिकेने दुकाने उघडण्यास जरी परवानगी दिली असली तरी प्रत्येक वॉर्डात, विभागात तेथील सहाय्यक आयुक्त यांना दुकाने सम-विषम तारखेप्रमाणे की एकदा डावी, एकदा उजवी बाजू याप्रमाणे दुकाने उघडावीत याबाबत परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांनी बहाल केले आहेत. त्यामुळे आता सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या नियोजनाप्रमाणेच त्या त्या विभागातील दुकाने उघडण्यात येत आहेत.
आरोग्याबाबत काळजी घेणे बंधनकारक
पालिकेने, दुकानदार मालक, कर्मचारी यांना सामानाची, वस्तूची विक्री करताना तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सामाजिक अंतर राखणे याबाबत बंधन घातले आहे. तसेच ग्राहकांनाही याबाबतच्या अटीशर्तीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसारच ग्राहकांनी आज वस्तूंची खरेदी केली.
दादर, धारावी, माहीममध्येही दुकाने सुरू
जी/उत्तर विभागातील दादर, माहीम आणि धारावीतही प्रतिबंधित क्षेत्रे वगळून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पूर्व आणि दक्षिणेकडील दुकाने तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पश्चिम तसेच उत्तर दिशेकडची दुकाने सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवा देणारी किराणा माल, औषधे आणि दूध विक्रीची दुकाने सोडून इतर दुकाने रविवारी बंद राहणार आहेत, असे आदेश जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिले.