सिडनी / वृत्तसंस्था
सिडनी सिक्सर्सचा जलदगती गोलंदाज टॉम करण उर्वरित बिग बॅश लीग हंगामातून बाहेर फेकला गेला. टॉम करणला पाठीची दुखापत झाली असून यावर उपचार करवून घेण्यासाठी तो तातडीने मायदेशी रवाना होणार आहे. विद्यमान विजेत्या सिडनी सिक्सर्स संघाला फिरकीपटू बेन मनेती व स्टीव्ह ओकिफे यांचीही गैरहजेरी जाणवू शकते. हे दोघेही दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले आहेत.
टॉम करणने या हंगामात खेळलेल्या 4 सामन्यात 6 बळी घेतले. शिवाय, उर्वरित महत्त्वाच्या टप्प्यात तो इंग्लिश संघसहकारी ख्रिस जॉर्डनसह लक्षवेधी योगदान देण्यासाठी महत्त्वाकांक्षी होता. 2019-2020 च्या विजयी हंगामात त्याने संघातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. अगदी मध्यफळीत फलंदाजी करतानाही त्याने लक्षवेधी योगदान दिले. मागील आवृत्तीत मात्र तो खेळू शकला नव्हता. प्रवासातील अडचणी आणि क्वारन्टाईनची जाचक अट यामुळे त्याने माघार घेणे पसंत केले होते. यंदा उर्वरित टप्प्यात अनेक महत्त्वाचे खेळाडू खेळणार नसले तरी आपला संघ उत्तम प्रदर्शन साकारेल, असा विश्वास या संघाचा कर्णधार मोईसेस हेन्रिक्यूजने व्यक्त केला.