यजमान ऑस्ट्रेलियासमोर सलामीचा पेच : पुकोवस्कीची दुखापत, जो बर्न्सच्या खराब फॉर्ममुळे व्यवस्थापनासमोर आव्हान, उभय संघातील पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून
वृत्तसंस्था / सिडनी
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध ऍडलेडमध्ये होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला आहे. वॉर्नरला यापूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेदरम्यान धोंडशिरेची दुखापत उद्भवली होती. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी दि. 17 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.
उभय संघातील ही पहिली कसोटी दिवस-रात्र स्वरुपात होणार असून त्यानंतर दि. 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवल्या जाणाऱया पारंपरिक बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी पूर्ण तंदुरुस्त राहण्याचा वॉर्नरचा यापुढे प्रयत्न असणार आहे.
‘मी दुखापतीतून उत्तमरित्या सावरत आहे. पण, मी स्वतः माझ्या तंदुरुस्तीविषयी समाधानी असल्याशिवाय घाई करणार नाही. मी कसोटी क्रिकेटसाठी 100 टक्के तंदुरुस्त आहे, याची खात्री माझ्या संघसहकाऱयांना देखील असायला हवी. यात रनिंग बिटविन द विकेट व चपळ क्षेत्ररक्षणाचा प्रामुख्याने समावेश होतो. सध्या इतकी पूर्ण तंदुरुस्ती नाही, असे मला वाटते आणि यासाठी 10 दिवसांची विश्रांती पुरेशी ठरेल’, असे वॉर्नरने पुढे नमूद केले.
34 वर्षीय वॉर्नरला भारताविरुद्ध सिडनीत संपन्न झालेल्या दुसऱया वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली आणि त्यानंतर कॅनबेरातील तिसरी व शेवटची वनडे आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो खेळू शकला नव्हता. भारताने टी-20 मालिका 2-1 फरकाने जिंकली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने देखील वॉर्नर दुसऱया कसोटी सामन्यात पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला. ‘जर सामना एकहाती फिरवण्याची ताकद एखाद्या खेळाडूकडे असेल तर तो खेळाडू म्हणजे डेव्हिड वॉर्नर. वॉर्नर इथवर पोहोचला आहे ते आपल्या फलंदाजीतील मजबुतीवर. पूर्ण संघासाठी तो नेहमीच प्रेरणादायी खेळ साकारत आला आहे. मेलबर्नमध्ये तो खेळावा, अशीच आमची अपेक्षा असेल’, असे लँगरने पुढे नमूद केले.
विल पुकोवस्कीही दुखापतग्रस्त
आता ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नर खेळणार नसल्याने यजमान संघासमोर मात्र सलामीला कोण, हा पेच असणार आहे. युवा फलंदाज विल पुकोवस्कीला हेल्मेटवर चेंडू आदळल्यामुळे त्यांच्याकडील आणखी एक पर्याय कमी झाला आहे. भारत अ विरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्यात खेळताना त्याला कन्कशनचा सामना करावा लागला होता.
वास्तविक, पुकोवस्कीचे कसोटीतील खेळणे जवळपास निश्चित मानले जात होते. पण, मंगळवारी मध्यमगती गोलंदाज कार्तिक त्यागीचा चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला आणि यानंतर दि. 11 पासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया सराव सामन्यात देखील तो खेळू शकत नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.
ऑस्ट्रेलियन संघातील आणखी एक सलामीवीर जो बर्न्स सध्या खराब फॉर्ममधून जात आहे आणि यामुळे यजमानांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. त्याला पहिल्या सराव सामन्यात अनुक्रमे 4 व 0 धावांवर समाधान मानावे लागले. अगदी या हंगामात देखील लाल चेंडूवरील क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 8.71 इतकी निव्वळ राहिली आहे. आता दुसऱया सराव सामन्यात तरी सूर सापडतो का, हे बर्न्स आजमावून पाहील, असे संकेत आहेत.
नवोदित सलामीवीर विल पुकोवस्की पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्ण तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात, दुखापती कोणाच्याही नियंत्रणात असत नाहीत. अशा समस्यांचा सर्वांना सामना करावाच लागतो.
-ऑस्ट्रेलियन उपकर्णधार पॅट कमिन्स
भारत अ विरुद्ध सराव सामन्यात खेळण्यापूर्वी मी जागतिक स्तरावरील इतक्या अव्वल गोलंदाजांचा फारसा सामना पेलेला नव्हता. विशेषतः मध्यमगती गोलंदाज उमेश यादवला सामोरे जाणे अधिक आव्हानात्मक होते, असे मला जाणवते. त्याच्या गोलंदाजीत बरेच वैविध्य आहे.
-ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन