वृत्तसंस्था/ बेंगळूर
सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला कर्नाटक संघाचा कर्णधार मनीष पांडेला मुकावे लागत आहे. मनीष पांडेच्या कोपराला ही दुखापत झाली असल्याने त्याने या संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत खेळताना मनीष पांडेच्या कोपराला ही दुखापत झाली होती. या दुखापतीवर इलाज चालू असून पांडेचे सध्या वास्तव्य बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. कर्नाटकाचा संघ सय्यद मुस्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. डॉक्टरांनी पांडेला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटक संघाला या स्पर्धेत आता मनीष पांडे तसेच मयांक अगरवाल आणि के. एल. राहुल यांची उणीव चांगलीच भासणार आहे. अगरवाल आणि राहुल हे सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर आहेत. कर्नाटक संघाचे नेतृत्त्व आता अनुभवी करुण नायरकडे सोपविण्यात आले असून देवदत्त पडिक्कल हा या संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यावेळी मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकाचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यांचा सलामीचा सामना जम्मू-काश्मीर संघाबरोबर 10 जानेवारीला बेंगळूरमध्येच होणार आहे.