वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमारने हाताला झालेल्या दुखापतीमुळ ऑलिम्पिक क्वालिफायर निवड चाचणी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
‘माझ्या हाताला प्रॅक्चर झाले असल्याने मी चाचणी स्पर्धेत भाग घेणार नाही. पूर्ण फिट झाल्यानंत मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यास सज्ज होईन,’ असे सुशीलने सांगितले. सुशील कुमारने या संदर्भात वैद्यकीय दाखला भारतीय कुस्ती फेडरेशनकडे सादर केला आहे. ‘मी फेडरेशनकडे वैद्यकीय दाखला पाठविला असून त्यावर तेच येत्या काही दिवसांत चर्चा करून निर्णय घेतील. फेडरेशनचा नियम मला बंधनकारक राहील,’ असेही तो म्हणाला.
फेडरेशनमधील सूत्रानेही या संदर्भात समिती चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. येथील खाशाबा जाधव कुस्ती इनडोअर स्टेडियमवर भारताचे फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन कुस्ती संघ निवडण्यासाठी शुक्रवारी चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीत विजयी झालेल्या मल्लांची दोन स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड केली जाणार आहे. यातील पहिली मानांकन मालिका 25 ते 28 जानेवारी या कालावधीत इटलीतील रोममध्ये होणार आहे.