बांदा दुग्ध उत्पादक संस्थेने बजावली थक्क करणारी कामगिरी : सात लाखाचा मिळविला निव्वळ नफा
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थाही कोलमडून पडल्याने सर्वत्र बेरोजगारीचे सावट पसरले असताना सिंधुदुर्गातील बांदा पंचक्रोशीतील ग्रामीण शेतकऱयांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या एका दुग्ध व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करीत चक्क सात लाखाचा नफा मिळवला. या नफ्यातील पाच लाख रुपये ऐन दिवाळीत शेतकऱयांना बोनस रुपाने वाटले. यात आणखी थक्क करणारी बाब म्हणजे यातील एका शेतकऱयाला तर या दुधाच्या माध्यमातून ऐन दिवाळीत चक्क एक लाखाचा बोनस मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
बांदा येथील बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसाईक संस्थेने ही कामगिरी करून दाखवली आहे. एकंदर उत्पादक प्रक्रियेवर कोरोनाचे सावट असतानाही या संस्थेने ही किमया साध्य करीत संस्था नफ्यात आणून दाखवली.
एक काळ असा होता आपल्या कोकणची अर्थव्यवस्था ही मनिऑर्डरवर चालायची. ऐन सणासुदीला मुंबईहून मनिऑर्डर आली की, गावातील गृहिणी खूष असायची. त्यावेळी पोस्टमन देवदुतासारखा वाटायचा. आता सिंधुदुर्गातील शेतकऱयाला त्याच्या स्वकष्टातून दिवाळीच्या दिवशी पाच लाखाचा बोनस मिळतोय, याकडे परिवर्तनाची नांदी म्हणून पाहावं लागेल. येथे पाच लाख ही रक्कम फार मोठी वाटते, ती यासाठी की, हे पैसे स्वकष्टाचे आहेत. यासाठी येथील शेतकऱयाला कोणापुढे हात पसरावे लागलेले नाहीत. कोरोनाच्या काळातील हे यश खरं तर अविश्वसनीयच म्हणावे लागेल.
पाच लीटर दूध जेव्हा एका गावातून विकलं जातं, तेव्हा गावातील एका बेरोजगाराला काम मिळतं. आपल्या जिल्हय़ात दररोज एक लाख लीटर दूध बाहेरून येतं. याचाच दुसरा अर्थ ज्यावेळी हे एक लाख लीटर दूध बाहेरून येतं, त्यावेळी जिल्हय़ात 20 हजार लोक बेरोजगार असल्याचं निश्चित होतं. साधारणपणे 600 मि. मी. पाऊस पडणाऱया अण्णांच्या राळेगणसिद्धीत दररोज पाच हजार लीटर दूध संकलन होते. पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारात 5 हजार 500 लीटर दूध संकलित होते. आपल्या जिल्हय़ात तीन हजार मि. मी. एवढा मुबलक पाऊस पडून आपल्या संपूर्ण जिल्हय़ातून फक्त 18 हजार लीटर दुधाचे संकलन होते. याचे कारण म्हणजे आपण कधी शेती वा शेतीपूरक व्यवसायाकडे गांभिर्याने न पाहता केवळ त्यातून मिळणाऱया सबसिडीचाच विचार करीत बसलो. आपण ‘ना दुधात स्वयंपूर्ण, ना भाजीपाला उत्पादनात’. कोंबडय़ा सुद्धा आपणास बाहेरून आणाव्या लागतात. अशा पद्धतीने आपण वागत राहिलो, तर राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून घेण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच राहणार नाही.
वरील सर्व एकंदर परिस्थितीचा विचार करता बांदा पंचक्रोशी दुग्ध व्यावसाईक संस्थेचे कौतूक यासाठी वाटते की, ही संस्था या सर्वाला अपवाद ठरलेली आहे. प्रतिकुल परिस्थितीवरही या संस्थेने मात केली आहे. चेअरमन नारायण उर्फ गजा गायतोंडे व सचिव दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 350 सभासद असलेल्या या संस्थेने दुग्ध व्यवसायात यावर्षी तब्बल सात लाखांचा नफा मिळवला. या संस्थेला शेर्ले, आरोसबाग, वाफोली, इन्सुली, गाळेल, विलवडे आदी गावांतील शेतकरी दूध पुरवतात. संकलित झालेल्या या दुधाची स्थानिक पातळीवर विक्री केल्यानंतर उर्वरित दूध गोकुळ दूध डेअरीला विकले जाते. दररोज किमान 250 ते 300 लीटर दुधाचे संकलन ही संस्था करते. एकंदर या व्यवसायातून यावर्षी संस्थेला सात लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. या नफ्यातील दोन लाख रुपये संस्थेच्या खर्चाकरीता बाजूला ठेवून उर्वरित पाच लाख रुपये संस्थेला दुध पुरवठा करणाऱया शेतकऱयांना बोनस रुपाने वाटण्यात आले. यातील वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे दूध पुरवठा करणाऱया यातील एका शेतकऱयाला सर्वाधिक म्हणजे एक लाख रुपयांचा बोनस मिळाला. त्यानंतर एका शेतकऱयाला 28 हजाराचा, तर अन्य एका शेतकऱयाला 25 हजार रुपयांचा बोनस दिवाळीत मिळाला. सिंधुदुर्गातील एखाद्या दूध संस्थेने मिळविलेला हा सर्वाधिक नफा म्हणून याकडे पाहता येईल. खरं तर दूध पुरवठा करणाऱया या शेतकऱयांचा स्वकष्टातून मिळवलेला बोनस म्हणावा लागेल.