कणकवलीनजीक अपघातात एक गंभीर : दोघांची बहिणीशी भेट अधुरीच, तर एकाची बहिणीशी भेट ठरली अखेरची
प्रतिनिधी / कणकवली:
मुंबई-गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे युवक ठार, तर एक युवक गंभीर जखमी झाला. मयत तिघांमध्ये अदमापूर-कोल्हापूर येथील दोघे सख्खे चुलत भाऊ व तिसरा पाचल-राजापूर येथील आहे. पाचल येथीलच गंभीर जखमीवर पडवे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
मृत झालेल्यांमध्ये भुदरगड तालुक्यातील अदमापूर येथील सात्तापा शिवाजी पाटील (26), अजय हिंदुराव पाटील (20) व पाचल येथील अस्लम कल्लोट (22) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी युवकाचे नाव अश्रफ प्रफुल्लकर (25 पाचल, राजापूर) असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बहिणीला भेटायला जात होते
शनिवारी दुपारच्या सुमारास अदमापूरहून सताप्पा शिवाजी पाटील व अजय हिंदूराव पाटील हे दोघे सख्खे चुलत भाऊ मोटारसायकलने (एमएच 08 क्यू 5752) ओरोस येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या सताप्पाच्या बहिणीला भेटण्यासाठी येत होते. याच दरम्यान, अस्लम कल्लोट हा आपला सहकारी अश्रफ प्रफुल्लकर याच्यासमवेत मोटारसायकलने (एमएच 10 सीजी 3803) कणकवलीहून पाचलकडे जात होता. अस्लम कल्लोट याच्या बहिणीची कणकवलीमध्ये प्रसुती झालेली असल्याने तिला भेटून तो परतत होता.
जोरदार धडक, एक जागीच ठार
जानवली कृष्णनगरी परिसरात हायवेचे काम सुरू असल्याने तेथे रस्ता एक दिशामार्ग आहे. दुपारच्या सुमारात या दोन्ही मोटारसायकल वेगात एकमेकांवर जोरदार आदळल्या. ही धडक एवढी जबरदस्त होती की चौघेही रस्त्यावर फेकले गेले. चौघांचीही डोकी रस्त्यावर आदळली. त्यामुळे रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. एकाचे हेल्मेटही दूरवर पडले होते. प्रत्यक्षदर्शीनी तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र, एकाचा जागीच मृत्यू झाला होता. उपजिल्हा रुग्णालयात दुसऱयाचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या दोघांना पडवे येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू उबाळे, रुपेश गुरव, मनोज गुरव, महिला पोलीस हवालदार ममता जाधव यांनी पंचनामा केला. अपघाताच्या माहितीनंतर नांदगाव येथल रज्जाक बटवाले यांच्यासह नांदगाव नागरिक कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
बहिणीची भेट झालीच नाही
सताप्पा पाटील यांची बहिणी श्रीमती पाटील या ओरोस पोलीस ठाण्यात महिला पोलीस म्हणून कार्यरत आहेत. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सताप्पा हा चुलतभाऊ अजय पाटील याला घेऊन ओरोसकडे जाण्यासाठी येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने जानवली येथे एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने वेगात असलेल्या या मोटारसायकल एकमेकांवर आदळत हा अपघात झाला. यात सताप्पा व अजय या दोघांचाही मृत्यू झाल्याने त्यांची बहिणीची भेट अधुरीच राहिली.
त्याची बहिणीची भेट ठरली शेवटची
पाचल येथील अस्लम कल्लोट याच्या बहिणीची येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत झाली आहे. त्यामुळे बहिणीला भेटण्यासाठी अस्लम कल्लोट हा गावातीलच अश्रफ प्रफुल्लकर याच्यासह कणकवलीला आला होता. बहिणीला भेटून परत गावी जात असताना हा अपघात घडला. यात अस्लमने बहिणीची घेतलेली भेट ही शेवटची ठरली.