प्रतिनिधी /काणकोण
राष्ट्रीय महामार्गावर शर्यत मारताना एका महागडय़ा दुचाकीच्या धक्याने अपघातग्रस्त झालेल्या लोलये येथील श्रीमती शकुंतला म्हाळशी या महिलेचे 12 रोजी रात्री इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले. काल सोमवार दि. 13 रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माड्डीतळप येथे फुलांच्या हारांची विक्री करून सदर महिला आपला उपजीविका चालवीत होती. रविवार दि. 12 रोजी सकाळी मडगाव ते पोळे पर्यंत शर्यतीत उतरलेल्या एका महागडय़ा दुचाकी वाहनाने धक्का दिल्यामुळे तिच्या हाता पायाना तसेच डोक्याला जबर मार बसला होता. जखमी अवस्थेत मडगावच्या इस्पितळात दाखल केले असता रात्रौ तिचे निधन झाले. काणकोणच्या पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून सदर दुचाकी ताब्यात घेतली असून दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक तुळशिदास नाईक पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या शर्यतीना राष्ट्रीय हमरस्त्यावर परवानगी देऊ नये अशी जोरदार मागणी या भागातून आता व्हायला लागली असून परत अशा प्रकारची वाहने रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर स्थानिक नागरीक कायदा हातात घेऊन योग्य ती कारवाई करेल असा स्पष्ट इशारा लोलयेचे माजी पंच आणि सामाजिक कार्यकर्ते सांतान दा कॉस्ता यांनी दिला आहे.