वाहनचालकांसाठी नवे नियम : निष्काळजीपणा दर्शविल्यास भरावा लागणार मोठा दंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्ते परिवहन मंत्रालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. यात 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी वाहनावरून नेण्यासाठी नव्या सुरक्षा नियमांना अधिसूचित करण्यात आले आहे. या नव्या नियमांमध्ये दुचाकी चालकाला मुलांसाठी हेल्मेट अणि हार्नेस बेल्टचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. तसेच वाहनाचा वेग केवळ 40 किलोमीटर प्रतितासपर्यंत मर्यादित ठेवावा लागणार आहे. यापूर्वी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने एक मसुदा अधिसूचना जारी करत नियमांमध्ये बदलाचा प्रस्ताव मांडला होता.
नव्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. दुचाकी वाहनावर मागे बसणाऱया मुलांसाठी अधिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नव्या नियमाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. हा नियम 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असणार आहे.
नव्या नियमांनुसार वापरला जाणारा सेफ्टी हार्नेस वजनाने हलका, वॉटरप्रूफ, कुशनयुक्त असायला हवा आणि यात 30 किलोग्रॅम वजन वाहन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. प्रवासाच्या पूर्ण कालावधीदरम्यान मुलाला सुरक्षित करण्यासाठी वाहन चालविणाऱयाला मुलाच्या सुरक्षेसाठी हार्नेसशी बांधायचे असते, हा हार्नेस दोन पट्टय़ांसह उपलब्ध असतो.
या नव्या नियमात प्रवासादरम्यान क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेटदेखील परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच सरकारच्या निकषांची पूर्तता करणारे हेल्मेट असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्मात्यांना मुलांसाठी हेल्मेट निर्माण करण्याची सूचना केली आहे. नवा नियम दुचाकी वाहन चालविणाऱयांना मुलांसोबत प्रवास करताना वाहनाचा वेग 40 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक असू नये हे अनिवार्य करतो.
पुढील वर्षापासून नियमांची अंमलबजावणी
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानुसार, 15 फेब्रुवारी 2022 रोजी यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा नियम पुढील वर्षी म्हणजेच 15 फेबुवारी 2023 पासून लागू होणार आहे. सध्या या नियमात दंडाची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. या नियमासाठी दंडाची रक्कम राज्य सरकारे निश्चित करणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाने मुलांच्या सुरक्षा विषयक प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. कारमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी चाईल्ड लॉक समवेत अनेक फीचर्स प्रदान केली जात असतात. या फीचर्सद्वारे मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत असते.
नव्या प्रस्तावानुसार नियम…
@ 4 वर्षांपर्यंतच्या मुलाला दुचाकीवर मागे बसवून नेतेवेळी बाईक, स्कुटर, स्कुटी यासारख्या वाहनांचा कमाल वेग 40 किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक असू नये.
@ दुचाकी वाहनचालकाच्या मागे बसणाऱया 9 महिन्यांपासून 4 वर्षांपर्यंतच्या मुलाने क्रॅश हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे.
@ 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्वतःसोबत दुचाकीवर सुरक्षित ठेवण्यासाठी चालकाने सेफ्टी हार्नेसचा वापर करणे आवश्यक आहे.