प्रतिनिधी/ संकेश्वर
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार 8 रोजी सायंकाळी संकेश्वर-व्हन्नोळी मार्गावर घडली. मनोज गोविंद बिरंजे (वय 50, रा. व्हन्नोळी, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, मनोज बिरंजे हे रविवारी सायंकाळी संकेश्वरकडून व्हन्नोळीकडे जात होते. दरम्यान, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर मनोज आले असता अचानक त्यांची दुचाकी घसरली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मनोज यांना उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले. मात्र, मनोज यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत..