रामदुर्ग तालुक्यातील चन्नापूरनजीकची घटना
वार्ताहर /रामदुर्ग
दुचाकी व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवार 27 रोजी सायंकाळी तालुक्मयातील चन्नापूर गावानजीक घडली. मनोराज हेब्बाळप्पा सालमंटपी (रा. हेब्बाळ, सध्या रा. लोकापूर, ता. मुधोळ) असे मृताचे तर रामव्वा इरन्नवर व अक्षता इरन्नवर (दोघे रा. लोकापूर) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, तालुक्मयातील बटकुर्कीमार्गे चन्नापूरकडे दुचाकीवरून मनोराज, रामव्वा व अक्षता जात होते. तर चन्नापूरहून स्विफ्ट कार बटकुर्कीकडे येत होती. दरम्यान, दोन्ही वाहने चन्नापूरनजीक आली असता समोरासमोर त्यांची धडक झाली. यात मनोराज जागीच ठार झाले. तर रामव्वा व अक्षता गंभीर जखमी झाल्या आहेत.
कारचालक फरारी
घटनेनंतर कारचालक फरारी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर जखमींना उपचारासाठी रामदुर्ग सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शवविच्छेदन करून मनोराज यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.