पणजी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
पणजी पोलिसांनी पेलेल्या कारवाईत एका दुचाकी चोरटय़ाला अटक केली असून त्यांनी चोरलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव शिवा पाटील (22) असे आहे, तो मुळ कर्नाटकी असून गेल्या काही वर्षापासून ओल्ड गोवा येथे भाडय़ाच्या जागेत राहत होता. संशयित सराईत चोरटा असून या अगोदरही पोलिसांनी त्याला चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे.
दुचाकी चोरून नंतर त्याची नंबर प्लेट बदलून तसेच रंगही बदलून काही दिवस वापरली जाते. नंतर त्याचे सुटे पार्ट काडून विकले जातात व नंतर ती दुचाकी अडगळीच्या जागेत ठेवून दोन ते तीन वर्षानंतर भंगाराला विकणे असाच त्याचा धंदा आहे. जप्त केलेल्या काही दुचाकीही अशाच प्रकारे अडगळीच्या जागेत ठेवलेल्या पोलिसांना सापडल्या आहेत. संशय़िताने आणखीनही काही दुचाकी चोरल्याचा संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.