चिपळूण
पिरलोटेहून चिपळूणच्या दिशेने येणाऱया तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट परशुराम घाटात खोल दरीत कोसळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
भावेश शशिकांत भोंगे (27, खेर्डी-मफतलाल कॉलनी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद राजेश शशिकांत भोंगे (21, खेर्डी-मफतलाल कॉलनी) यांनी दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश हा शनिवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील पिरलोटे येथील पुष्कर कंपनीतून चिपळूणच्या दिशेने आपल्या ताब्यातील दुचाकीने येत होता. तो परशुराम घाटात आला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीसह परशुराम घाटातील ताज हॉटेलच्या पुढील यू आकाराच्या वळणाच्या उजव्या बाजूला खोल दरीत कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.