वार्ताहर/ संगमेश्वर, राजापूर, लांजा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक ओझरखोल येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी दीडशे फूट दरीत कोसळून लांजातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका अपघातात राजापूर-वरचीपेठ पुलाजनीक कोंढेतड वळणावर एक ट्रक दरीत कोसळला. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने गाडीबाहेर उडी मारल्याने तो बचावला. तर लांजा तालुक्यातील कोचरी येथे बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धासह आसगे येथील अपघातात एका जखमी तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. एकाच दिवशी घडलेल्या चारपैकी तीन घटनांमध्ये लांजातील तिघांचा मृत्यू झाला.
ओझरखोल येथील दुचाकी अपघातात संकेत विजय चव्हाण (23, तेली मठ, ता. लांजा) याचा जागीच मृत्यू झाला. राजापूर-कोंढेतड येथील अपघातात ट्रकचालक प्रथमेश पुंडलिक साळुंखे (रा. सावर्डा) ट्रकमधून उडी मारल्याने थोडक्यात बचावला. लांजा-कोचरी येथे बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तुकाराम यशवंत बेंद्रे (65, ऱा कोचरी-लांजा) व आसगे अपघातात जखमी झालेल्या मोहन कृष्णा साळुंखे (36, रा. बेनीखुर्द तेलीवाडी) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संकेत चव्हाण दुचाकीने (एमएच-08-एयुö9845) पालाच्या दिशेने जात होता. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तो गाडीसह साकवाच्या पऱयात कोसळला. अपघातात संकेतच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे संतोष झापडेकर, पोलीस उपनिरीक्षक पन्हेळे घटनास्थळी पोहोचले. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील सुभाषचंद्र वाडकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला
गोव्याकडून मुंबईकडे टायर भरून जाणारा ट्रक (आरजे 23 जीबी 3471) वरचीपेठ कोंढेतड वळणावर मोठय़ा पुलाजनीक सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना चालकाने उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला. यात चालक रामप्रसाद मिना (35, राजस्थान) याला दुखापत झाली असून ट्रकचे मोठे नुकसान झाले. त्याला तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र तुळसावडेकर, भास्कर कुवळेकर, सुनील पटेल यांच्यासह अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक संतोष वालावलकर, पोलीस कर्मचारी सागर कोरे, वाहतूक पोलीस सचिन बळीप आदी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. या ट्रकमध्ये चालकासह अन्य एकजण असून तो ट्रकमध्येच अडकल्याची चर्चा रंगली होती. ग्रामस्थ व पोलिसांनी दरीत उतरून शोध घेतला मात्र दुसरी व्यक्ती आढळली नाही. दरम्यान ट्रकच्या मालकाशी संपर्क साधला असता त्याने चालक एकटाच असल्याची माहिती पोलिसांना दिली.
आंबेडखुर्द येथे ट्रकला अपघात
संगमेश्वरनजीक आंबेडखुर्द येथे शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास घाटगेöपाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक अपघातग्रस्त झाला. ट्रकचालक प्रथमेश पुंडलिक साळुंखे ट्रक घेऊन रत्नागिरी ते दापोली जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याकडेच्या झाडाला आदळला. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लांजात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धाचा मृत्यू
लांजा तालुक्यातील कोचरी येथे बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तुकाराम यशवंत बेंद्रे (65, कोचरी लांजा) या वृद्धाचा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम हे 27 डिसेंबर रोजी लांजा कोचरी येथे बेशुद्धावस्थेत आढळले होत़े जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय आपासणीत त्यांच्या शरीरात विषाचा अंश आढळून आला होता. मात्र हे विष त्यांनी प्राशन केले की सर्पदंशाचे, याबाबत तपास सुरु आह़े शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल़ा
आसगे अपघातातील ‘त्या’ जखमी तरुणाचे निधन
लांजा-आसगे-दाभोळे मार्गावर आसगे दत्त मंदिरशेजारी बुधवारी सकाळी ट्रकला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात बेनीखुर्द तेलीवाडी येथील दुचाकी चालक मोहन कृष्णा साळुंखे गंभीर जखमी झाला होता. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. सिमेंट वाहतूक करणारा ट्रक व दुचाकी अपघातात दुचाकीचालक मोहन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुध्दावस्थेत पडला होता. आसगेतील नागरिक व वाहनचालकांनी त्याला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात व शुक्रवारी मुंबईत केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.