सीआयडी वनविभागाची रायबाग येथे कारवाई, एकजण फरारी
प्रतिनिधी /बेळगाव
दुतोंडी सापाची विक्री करणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सीआयडी पोलीस वनविभागाच्या पथकाने रायबाग येथे ही कारवाई केली असून या टोळीतील आणखी एक संशयित फरारी झाला आहे. पोलिसांनी एक दुतोंडी साप जप्त केला आहे.
सत्याप्पा माळाप्पा हिरेकुडी (वय 42, रा. निडगुंदी, ता. रायबाग), महांतेश रावसाब कांबळे (वय 27, मूळचा रा. कोळीगुड्ड, सध्या रा. बस्तवाड, ता. रायबाग) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. बिराप्पा हिरेकुडी (रा. निडगुंदी) हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रायबाग येथील लक्ष्मी लॉजजवळ दुतोंडी सापाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच सीआयडी पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील, आर. एस. अरिबेंची, के. डी. हिरेमठ, एम. एन. नाईक, यु. बी. पट्टेद, एल. एस. नाईक, आर. बी. कोरीकोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून दुतोंडी सापासह दोघा जणांना अटक केली.
पोलिसांनी छापा टाकताच या टोळीतील एक संशयित फरारी झाला आहे. या त्रिकुटावर वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांना रायबाग न्यायालयात हजर केले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. काही मांत्रिक, यांत्रिक व ज्योतिषांच्या सल्ल्याने दुतोंडी सापाची खरेदी करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. त्याला चांगला दर मिळतो म्हणून साप पकडून त्यांची विक्री केली जाते. सीआयडी पोलीस वनविभागाने यापूर्वीही वन्यप्राणी, पक्षी व सरपटणाऱया प्राण्यांची विक्री करताना अनेकांना अटक केली आहे.