प्रतिनिधी/कोल्हापूर, पुलाची शिरोली
दूध उत्पादक शेतकऱयाच्या दुधाला दर वाढ मिळावी, या मागणीसाठी गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. सरकारबरोबर राहून आंदोलन करणाऱया शेट्टींवर टीकाही झाली होती. त्यावेळी दुधाला मिळालेली उकळी थंड होते न होते, तो पर्यंत भाजपनेही या प्रश्नावर शनिवारी राज्यभर आंदोलन करत दुधाला दुसरी उकळी दिली.
दूध दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये व दूध भुकटीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान मिळाले पाहिजे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्हय़ात आंदोलन केले. भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक, कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे आदींसह पदाधिकाऱयांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात रिपाइंचे नेते प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारीही भाजपच्या पदाधिकाऱयांच्या साथीने सहभागी झाले होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हय़ातील विविध तालुक्यातील गावागावात आंदोलन करण्यात आले. रास्तारोको करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. दूध न ओतता काही ठिकाणी दूधाचे वाटप करण्यात आले. शहरातही आंदोलन करण्यात आले.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला
जिल्हय़ात आंदोलनाला सकाळी सुरूवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभमीवर दक्षता घेण्यात आली होती. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक व जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पंचगंगा नदी शेजारी पुलाची शिरोली येथील दर्ग्यासमोर मुंबईच्या दिशेने जाणारे दूध टँकर यावेळी रोखण्यात आले. राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये व दूध भुकटीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेत पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवली. दुधाचा टँकर येताच धनंजय महाडिक यांनी महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. त्यानंतर सुमारे दहा मिनिटे हे आंदोलन चालले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक, जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, पंचायत समिती सदस्य डॉ. सौ. सोनाली पाटील, तालूका अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य सतिश पाटील, भगवान काटे, नागावचे सरपंच अरुण माळी, रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, संदिप पोर्लेकर, किरण कौंदाडे, आदी उपस्थित होते. सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करुन सर्वांना सोडून देण्यात आले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपअधीक्षक पद्मजा कदम, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, सुशांत चव्हाण यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.