अहमदाबाद आणि सांगलीतील आठ जणांवर गुन्हा
मिरज / प्रतिनिधी
दुबईतील बँकेकडून २१ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक करण्यांत आली. याबाबत सांगलीतील दोघांसह आठजणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डॉ. दत्तात्रय दुबे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिरजेतील डॉ. दत्तात्रय दुबे यांचा सोलापूर येथे मोठा पोल्ट्रीफार्म आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी परदेशी बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी सांगलीतील योगेश जावळे व प्रमोद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अहमदाबाद येथील दिनेश देसाई प्रविण शहा यांच्या भेटीला नेऊन दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. डॉ.दुबे यांनी स्थानिक बँकेकडून कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन रिझर्व्ह बँकेकडे पाठविले. तेथून लोन रजिस्टर क्रमांकासह कर्जाचा प्रस्ताव दुबईतील अलशरीफ व महंमद सरावत नामक मध्यस्थाकडे पाठविण्यात आला. अल शरीफ याने स्टॅम्प ड्यूटी व प्रोसेस फी म्हणून १ कोटी २५ लाख रुपये डॉ. दुबे यांना भरायला सांगितले.
त्यानुसार अलशरीफ याने सांगितलेल्या बँक खात्यावर डॉ. दुबे यांनी गेल्य़ा वर्षभरात ७८ लाख जमा केले. दिनेश देसाई प्रविण शहा यांनी कमिशन म्हणून १४ लाख रुपये घेतले. त्यानंतर अलशरीफ याने दुबईतील बॅकेची २१ कोटी रुपये जमा केल्याची ट्रांस्फर स्लीप डॉ.दुबे यांना पाठविली. मात्र ही रक्कम जमा झाली नसल्याने डॉ. दुबे यांनी संपर्क साधला असता त्यांना दुबई व अहमदाबाद येथील मध्यस्थांनी आणखी रक्कम भरायला सांगितली. कर्ज देण्यास टाळाटाळ सुरु झाल्याने डॉ. दुबे यांनी योगेश जावळे , प्रमोद आप्पी देशपांडे रा. विश्रामबाग सांगली , दिनेश देसाई, प्रविण कुर्डुवार, भारतभूषण परांजपे ६ प्रविणचंद्र मणीलाल शहा सर्व रा. अहमदाबाद डॉ. अलशरीफ, महंमद सरावत रा. दुबई या आठजणांविरुद्ध फसवणूकीची तक्रार दिली आहे. कर्जाच्या आमिषाने ९२ लाखाच्या फसवणूकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.