प्रवाशांचे उत्तर व दक्षिण गोव्यात विलगीकरण
प्रतिनिधी / वास्को
सोमवारी मध्यरात्री दुबईहून 155 भारतीय नागरिक गोव्यात परतले. एअरबस ए320 या विमानाने ते दाखल झाले. हे प्रवासी दुबईत अडकले होते. या प्रवाशांना दक्षिण व उत्तर गोव्यात कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
दुबईहून 155 हवाई प्रवासी दाबोळी विमानतळावर दाखल होताच, रात्रीच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर 30 प्रवाशांना दक्षिण व उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले. तर गोव्या बाहेरील प्रवाशांना प्रवास पास देण्यात आले. या प्रवाशांमध्ये 3 गरोदर महिला व तीन व्यक्ती वैद्यकीय उपचार घेणारे होते.
प्रवाशांचा कॉरन्टाईन होण्यास विरोध
दुबईहून उतरलेल्या काही प्रवाशांनी सुरवातीला हॉटेलमध्ये कॉरन्टाईन होण्यास नकार दिला. या प्रवाशांची भुमिका पाहून इतर प्रवाशांनीही हॉटेलमध्ये कॉरन्टाईन होण्यास नकार दिला. आपल्याला कॉरन्टाईनसाठी पैसे मोजण्यास परवडणार नसल्याची तक्रार त्यांनी मांडली. या प्रवाशांनी कारणे सांगून हॉटेलमध्ये कॉरन्टाईन होण्यास नकार दिल्याने काही वेळ दाबोळी विमानळावरील वातावरण तापले. यावेळी विमानतळावर दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस व मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून या प्रवाशांची समजूत काढली. त्यामुळे प्रवासी नरमले व विनाशर्त कॉरन्टाईन होण्यास तयार झाले. त्यानंतर या प्रवाशांना मडगाव येथील कोलवा किनारा, कोलमर हॉटेल, प्लॅनेट हॉलिहुड व पणजी येथील हॉटेल जिंजर येथे बसमधून पाठविण्यात आले.
काल मंगळवारी दाबोळी विमानतळावर 131 प्रवासी दाखल
देशांतर्गंत हवाई प्रवासात काल मंगळवारी दाबोळी विमानतळावर 131 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी तीन विमानांचे आगमन झाले. परतीच्या प्रवासात तीन विमानांतून 64 प्रवाशांनी हैद्राबाद तर 261 प्रवाशांनी दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले.
दुपारी एकच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 51 प्रवाशांसह हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून दुपारी दोनच्या सुमारास 64 प्रवाशांनी हैद्राबादला प्रयाण केले. दुपारी दीडच्या सुमारास दिल्लीहून विस्तारा एअरलाईन्सचे विमान 20 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान अडीचच्या सुमारास 89 प्रवाशांसह दिल्लीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर अडीचच्या सुमारास दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 60 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून साडेतीनच्या सुमारास 172 प्रवाशांनी दिल्लीला प्रयाण केले. काल एकूण 131 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले. तर एकूण 325 प्रवाशांनी हैद्राबाद व दिल्लीकडे उड्डाण केले.