वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारपासून दुबईत सुरू होणाऱया दुबई पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष व महिला विभागातील विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत व मानसी जोशी हे भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील.
भगत व जोशी दोघेही एसएल 3 खेळाडू असून 26 जणांच्या भारतीय संघाचे ते नेतृत्व करतील. भारताचे या स्पर्धेसाठी पाठविलेले ही सर्वात मोठे पथक आहे. एसएल 3 खेळाडू हे एक किंवा दोन्ही पायाने अधू असू शकतात आणि त्यांना चालताना, पळताना तोल सांभाळता येत नाही. त्यामुळे त्यांना उभ्यानेच खेळावे लागते. या पथकातील अन्य टॉपच्या खेळाडूंत दोनवेळचा आशियाई पॅरागेम्स चॅम्पियन पारुल परमार, 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्यविजेते सुकांत कदम, मनोज कुमार, कृष्णा नागर यांचा समावेश आहे. याशिवाय पलक कोहली यासारख्या आश्वासक खेळाडूंचाही समावेश आहे.
कोव्हिड 19 महामारीमुळे सुमारे वर्षभर क्रीडाजगत ठप्प झाले होते. त्याच्या प्रकोपाचा बहर हळूहळू ओसल्यानंतर विविध खेळांना सुरुवात झाली असून या ब्रेकनंतर बीडब्ल्यूएफने आयोजित केलेली ही पहिली पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आहे. याआधीची स्पर्धा फेब्रुवारी 2020 मध्ये पेरूमध्ये घेण्यात आली होती. दुबईतील स्पर्धेत यजमानांसह 29 देशांतील 127 पॅरा बॅडमिंटनपटूंनी भाग घेतला असून 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. यात अनेक वर्ल्ड चॅम्पियन्सचा खेळ पहावयास मिळणार असून त्यात इंडेनेशियाचे टॉपचे खेळाडू लीयनी रात्री ओक्तिला, सूर्यो नुग्रोहो, धेवा अन्रिमुष्ठी, फ्रान्सचा लुकास माझुर, मलेशियाचा चीह लाईक होयु यांचा समावेश आहे.