प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय महामार्ग क्रं 4 च्या सातारा-पुणे सेवा रस्त्यालगत दुतर्फा हॉटेल व्यवसायिकांच्या रांगा लागल्या आहेत. या हॉटेलमध्ये येणाऱया ग्राहकांची संख्या जास्त असते. मुख्य रस्त्याने सेवा रस्त्यावर येताना वाहनधारकांना वळण मारावे लागते. म्हणून हॉटेल व्यवसायिकांनी दुभाजक फोडून रस्ता केला होता. यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले. ही बाब पोलीसांच्या निदर्शनास आल्यावर याला पायबंद घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत.
सातारा-पुणे या महामार्गाने दररोज हजारोच्या संख्येने वाहने जात असतात. यावेळी या वाहनधारकांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून सेवा रस्त्यालगत शाहाकारी-मासांहारी हॉटेल व्यवसायिकांच्या रांगा लागल्या आहेत. सायंकाळच्या वेळी हॉटेलमध्ये येणाऱया ग्राहकांची संख्या जास्त असते. या ग्राहकांना हॉटेलमध्ये येताना लांब वळण मारून यावे लागते. यामुळे ग्राहकांची गैरसोय निर्माण होत आहे. ती थांबविण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी सेवा रस्त्यालगतचे दुभाजक फोडून रस्ता केला होता. या रस्त्याने ग्राहक हॉटेलमध्ये येत होते. हे हायवे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुभाजकाची दुरूस्ती केली. मात्र पुन्हा हॉटेल व्यवसायिकांनी दुभाजक फोडल्याने यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या दुभाजकांच्या मध्ये फलक लावण्यात आला आहे. दुभाजक खंडीत केल्यास आपणाविरूद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984, कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सदर गुह्यासाठी 5 वर्षापर्यंत कैद व दंड ही शिक्षा होवू शकते. असा फलक लावला आहे. कारवाईच्या भीतीने हॉटेल व्यवसायिकांनी दुभाजक फोडले नाही. मात्र या दुभाजकावर माती टाकून पुन्हा रस्ता केला आहे.