केंद्र सरकारकडून व्यापक नियोजन – लसीकरण मोहीम गतिमान होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असला तरी पुढील धोका विचारात घेऊन लसीकरणाला गती दिली जात आहे. जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत लस पोहोचवण्यासाठी देशात मोठय़ा स्तरावर लसीकरण मोहीम सुरू आहे. हे लसीकरण अभियान सरकार आता दुर्गम भागात सहज पोहचवण्याच्या योजनेवर काम करत आहे. याअंतर्गत आता सरकार देशाच्या त्या दुर्गम भागात ‘अनमॅन्ड एरियल व्हेईकल’ म्हणजे ड्रोनद्वारे कोरोना विषाणू प्रतिबंधक लसी पोहचवण्याची योजना आखत आहे. या योजनेद्वारे रस्ते नसलेल्या भागात किंवा डोंगराळ-दुर्गम ठिकाणी लसी पोहोचवणे शक्य होणार आहे.
लसपुरवठय़ासंबंधी आयआयटी कानपूरने केलेल्या संशोधनात दुर्गम भागात लसी पोहोचवण्याचा नवा मार्ग सुचविण्यात आला आहे. दुर्गम भागात कोरोना व्हॅक्सीन पोहचवणाऱया ड्रोनबाबत आयसीएमआरने सुद्धा संपूर्ण अभ्यास केला आहे. ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात कोरोना व्हॅक्सीन पोहचवता येऊ शकते का, याबाबतची आयसीएमआरची चाचणी यशस्वी ठरली आहे. आता केवळ तेलंगणामध्येच ड्रोनद्वारे कोरोना प्रतिबंधक लसी पोहोचवल्या जात आहेत.
सध्या देशात सरकारसाठी कोरोना व्हॅक्सीन खरेदी करण्याचे काम एचएलएल लाईफकेयर ही कंपनी करत आहे. तिची सहायक कंपनी एचएलएल इन्फ्राटेक सर्व्हिसेस लिमिटेडने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून देशाच्या दुर्गम भागात कोरोना व्हॅक्सीन पोहचवण्यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचे समजते.
…अशी असेल ड्रोनची व्यवस्था !
लसपुरवठा करण्यासाठी 35 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील अशा ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सदर ड्रोन 100 मीटर उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकतात. यासाठी स्टँडर्ड प्रोटोकॉलसह अशा ड्रोनचे मॉडेलसुद्धा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे ड्रोन 4 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असतील. केंद्रावर पोहचवून ते परत आपल्या मुख्य केंद्रावर येईल, अशी सुविधा असणार आहे.