पॅरिसच्या रस्त्यांवर 60 ऐवजी 30 किमी प्रतितासाचा वेग
फ्रान्सची सुंदर आणि ऐतिहासिक राजधानी पॅरिसमध्ये प्रदूषणात घट करण्यासाठी वाहनांचा कमाल वेग 30 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आला आहे. हा नवा नियम सोमवारपासून लागू देखील करण्यात आला आहे. शहराच्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी हे एक प्रारंभिक पाऊल असल्याचे पॅरिसच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे लोक देखील सुरक्षित होतील, कारण वाहन कमी वेगाने चालविल्याने दुर्घटना होणार नाहीत. पॅरिस शहर पायी चालणाऱयांसाठी आणखीन सुरक्षित आणि सुविधाजनक होईल. प्रशासनाच्या या निर्णयावर शहरातील 59 टक्के लोक सहमत आहेत. लोकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण काही लोक या निर्णयाला विरोध देखील करत आहेत.
21.6 लाखांची लोकसंख्या असलेल्या पॅरिसच्या काही भागांमध्ये कारपेक्षा सायकल चालविणे लोक अधिक पसंत करतात. या लोकांना भरधाव वाहनांचा फटका बसतो. सायकल चालवू पाहणाऱया लोकांसाठी नवा नियम संजीवनी ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आवाहनानंतर हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओने शहरातील वेगाची मर्यादा 60 किलोमीटर प्रतितासावरून कमी करत 30 किलोमीटर प्रतितास करण्याची सूचना केली होती. पण हा नियम मुख्य रिंग रोड आणि महामार्ग वगळता प्रत्येक ठिकाणी लागू होणार आहे. पॅरिसमध्ये जगप्रसिद्ध आयफेल टॉवर आहे. आयफेल टॉवर पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून सुमारे 65 लाख पर्यटक दाखल होत असतात.
सायकलस्वारांना सुरक्षा
पॅरिसच्या महापौर एनी हिडाल्गो यांच्यानुसार नव्या नियमाचा उद्देश वाहतूक सुरक्षा वाढविणे, सायकलस्वारांसाठी अधिक जागा निर्माण करणे, गोंगाट कमी करणे आणि हवामान संरक्षणात योगदान देणे आहे. या निर्णयाद्वारे वाहनांनी प्राप्त केलेली जागा मोकळी करण्याचा उद्देश आहे.