वार्ताहर/ पणजी
देशात दलीत समाज आणि दुर्बल घटकांना एकत्र घेऊन जाणारे भाजपा सरकार केंद्रात आहे. त्यात केंद्रीय तसेच राज्याच्या अनेक योजना आहेत. या योजना सर्व अतिदुर्बल घटकांपर्यंत पोहोचवून ‘नवभारत’ निर्माण करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. गोवा मुक्ती दिन लवकरच 60व्या वर्षात पदार्पण करत आहे. यात नवगोवा निर्माण करायचा स्वप्न पूर्ण करणार असून दुर्लक्षित घटक मागे राहणार नाही याची काळजी घेणार तसेच त्यांच्या समस्या सोडविणार असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाज कल्याण खाते आणि विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील आंबेडकर उद्यानात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, गोवा आणि समाजकल्याण खाते, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ावर पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या समवेत प्रमुख वक्ते गोवा कला अकादमीचे प्रा. रामराव वाघ, महाराष्ट्रातील माता फाऊंडेशनचे प्रवीण म. गांगुर्डे, गोवा मणिपाल हॉस्पिटलचे कर्करोगतज्ञ डॉ. शेखर साळकर, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष सखाराम कोरगावकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गोवा राज्याचे सतीश कोरगावकर, समाजकल्याण खात्याचे उमेशचंद्र जोशी, अशोक खाजनेकर, सूर्या साळकर, अशोक परवारकर व भीम बांधवांनी पुतळय़ावर पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रार्थना सादर केली. तद्नंतर खास कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासहीत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, रामराव वाघ, प्रवीण गांगुर्डे, डॉ. शेखर साळकर यांची प्रबोधनात्मक भाषणे झाली.
तत्पूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गोवा राज्य व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवातफर्ते म्हापसा येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाकडून पणजीपर्यंत काढलेल्या भीमज्योती रॅलीचे स्वागत आंबेडकर उद्यानात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ज्योत स्वीकारून केले.