प्रतिनिधी/ सातारा
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 12 ते 16 आठवडय़ाच्या दरम्यान(84 ते 112 दिवस)देण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालय, कस्तुबा रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र गोडोली येथील गर्दी कमी झाली आहे. यामुळे गेल्या दोन दिवसापासून लसीकरण केंद्र ओस पडली आहेत.
कोविशिल्ड आणि कोव्हॉक्सिन या दोन लसीचे दोन डोस नागरिकांना देण्यात येत आहेत. यामुळे सरकारी रूग्णालयात सह सर्वच खाजगी रूग्णालयात लस घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 45 दिवसांनी दुसरा डोस घेण्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांची दुसऱया डोस न मिळाल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी पुढील दुसरा डोस घेण्याकरीता लसीकरण केंद्रावर जावे. परंतु ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यांनी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे. कोव्हॉक्सिनच्या पहिल्या व दुसऱया डोसच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसून त्यांचे लसीकरण पूर्वी प्रमाणे सुरू राहणार आहे.