प्रतिनिधी /बेळगाव
दुसरे रेल्वे गेट येथील फाटक वरचेवर नादुरुस्त होत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने या रेल्वे गेटवर नवीन फाटक बसविले आहे. शनिवारी दुपारनंतर फाटक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नवीन फाटकासाठी चांगल्या प्रतीच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी फाटक नादुरुस्त होऊन प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही.
नेहमीच वर्दळीचे ठिकाण असणाऱया दुसरे रेल्वे गेट येथे मागील वर्षभरापासून फाटकाची समस्या निर्माण झाली होती. मध्यंतरी फाटक मोडून वाहनांचेही नुकसान झाले होते. काही वेळा वेळच्या वेळी फाटक उघडत नसल्यामुळे वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी नवे फाटक उभे करण्याची मागणी वाहनचालकांकडून नैर्त्रुत्य रेल्वेकडे केली जात होती.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी नवे फाटक बसविण्यात आले आहे. यामुळे या पुढील काळात तरी गेट नादुरुस्त झाल्याने होणारी गैरसोय टाळता येणार आहे. अशाच प्रकारचे गेट शहराच्या इतर भागातही बसविण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.