निवडणुकीबाबत संरक्षण खात्याच्या भूमिकेकडे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱयांदा वाढविलेली कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत दि. 10 फेबुवारी रोजी संपत असल्याने निवडणूक घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुदत पूर्ण होण्यास अवघे 28 दिवस राहिल्याने निवडणुकीची अधिसूचना जारी होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीवर डोळा ठेऊन सध्या काही विकासकामेही युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांचा कालावधी फेब्रुवारी 2020 मध्ये महिन्यात पूर्ण झाला होता. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कायद्यात बदल करून उपाध्यक्षांना काही अधिकार बहाल करण्यात येणार आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदींची दुरुस्ती करण्यात येत असल्याने सहा महिन्यांचा कालावधी वाढविला होता. मात्र, निवडणूक घेण्याच्यादृष्टीने कॅन्टोन्मेंट बोर्डने महिलांसाठी दोन वॉर्डाचे आरक्षण त्याचप्रमाणे अनुसूचित जातीसाठी वॉर्ड क्रमांक सात राखीव ठेवण्याची प्रक्रिया यापूर्वी राबविली होती. यामुळे फक्त निवडणुका जाहीर होण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांसह रहिवाशांचे लक्ष लागले. मात्र, मुदतवाढ देण्यात आल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. वाढविण्यात आलेला कालावधी जुलै महिन्यात पूर्ण झाला होता. पण याच दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्याने जुलैमध्ये पुन्हा दुसऱयांदा कॅन्टोन्मेंट बेर्डची मुदत वाढविण्यात आली होती. दुसऱयांदा वाढविण्यात आलेली मुदत दि. 10 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. मात्र, निवडणूक घेण्याच्यादृष्टीने संरक्षण खात्याने कोणत्याच सूचना केल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत संपुष्टात येणार असल्याने कॅन्टोन्मेंटवासियांचे लक्ष निवडणुकीच्या घोषणेकडे लागले आहे. मात्र जम्मुसह याच कॅन्टोन्मेंट बोर्डची मुदत वाढविण्यात आली असल्याने निवडणुका लवकर होण्याची चिन्हे धूसर आहेत.
त्यामुळे सदस्यांना तिसऱयांदा मुदतवाढ मिळणार की नॉमिनेट सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार याबाबतही चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्यादृष्टीने विकासकामे राबविण्याचा आटापिटा काही सदस्यांनी चालविला आहे. निधीअभावी गेल्या पाच वर्षात म्हणावी तशी विकासकामे राबविण्यात आली नसल्याने सदस्यांना मतदारांचा रोष पत्करावा लागला आहे. यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कामे पूर्ण करून घेण्यास काही सदस्य प्रयत्नशील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांच्याकडे निवडणूक वेळापत्रकाबाबत विचारणा केली असता, अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नसल्याचे सांगितले. मात्र, मुदत संपत आल्याने पुढील आठवडय़ात निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.