वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवारी झालेल्या दुसऱया ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या संजीव रजपूत व शेहजार रिझवी यांनी शानदार कामगिरी साकारली. झूम ऍपद्वारे सहभागी झालेल्या या ऑनलाईन स्पर्धेत तब्बल 190 नेमबाजांनी सहभाग नोंदवला होता.
सुरुवातीला झालेल्या 10 मी एअर रायफल प्रकारात भारताच्या संजीव रजपूतने 252.6 गुणाची कमाई करताना अव्वल क्रमांक पटकावला. ऑस्ट्रियाच्या मार्टिनने 251.7 गुणासह दुसरा तर फ्रान्सच्या गेरमोर्डने 230.1 गुणाची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, या प्रकारात रजपूतने सुरुवातीपासून आघाडी घेत वर्चस्व ठेवले. याशिवाय, 10 मी एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या शेहजार रिझवीने 241.7 गुणासह पहिला क्रमांक पटकावला. भारताच्या अमनप्रीत सिंगने 241.5 गुणासह दुसरा तर स्कॉटलंडच्या लुकी एव्हान्सने 214.9 गुणासह तिसरा क्रमांक मिळवला. या प्रकारात रिझवी व अमनप्रीत यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली. पण, अखेरीस इलेक्ट्रॉनिक टार्गेट पाँईटवर रिझवीने बाजी मारत अव्वल क्रमांक मिळवला.
गत आठवडय़ात या ऑनलाईन स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला होता. या स्पर्धेतही भारतीयांनी दमदार कामगिरी करत बाजी मारली होती. यानंतर, शनिवारी झालेल्या दुसऱया ऑनलाईन स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.