वृत्त संस्था/ हॅमिल्टन
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 460 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना विंडीजची पहिल्या डावात स्थिती 8 बाद 124 अशी केविलवाणी झाली आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात हेन्री निकोल्सने शानदार शतक (174) तर वेग्नरने नाबाद 66 धावा जमविल्या. विंडीजच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचे जेमीसन आणि साऊदी प्रभावी गोलंदाज ठरले.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत यजमान न्यूझीलंडने पहिली कसोटी डावाच्या फरकाने जिंकून विंडीजवर आघाडी मिळविली आहे. पहिल्या कसोटीत द्विशतक झळकविणारा कर्णधार विल्यम्सन दुसऱया कसोटीत उपलब्ध होवू शकला नाही. विल्यम्सनच्या गैरहजेरीत न्यूझीलंडचे नेतृत्व लेथमकडे सोपविण्यात आले आहे.
न्यूझीलंडने 6 बाद 294 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. 117 धावांवर नाबाद राहिलेल्या निकोल्सने कसोटी क्रिकेटमधील आपली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. त्याने 280 चेंडूत 1 षटकार आणि 21 चौकारांसह 174 धावा जमविल्या. वेटलिंगने 6 चौकारांसह 30, मिचेलने 5 चौकारांसह 42, जेमीसनने 3 चौकारांसह 20, साऊदीने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. मात्र वेग्नरने आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्याने न्यूझीलंडने 460 धावापर्यंत मजल मारली.
वेग्नरची ही 50 वी कसोटी असून त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. दुसऱया दिवशाच्या खेळातील पहिल्या 30 षटकांमध्ये न्यूझीलंडने 166 धावा झोडपल्या. विंडीजतर्फे गॅब्रियलने 93 धावांत 3, जोसेफने 109 धावांत 3, होल्डरने 110 धावांत 2 आणि चेसने 54 धावांत 2 गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजच्या पहिल्या डावाला तिसऱया षटकांपासून गळती लागली. संघाचे खाते उघडण्यापूर्वी साऊदीने सलामीच्या ब्रेथवेटला झेलबाद केले. त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.ब्लॅकवूडने 92 चेंडूत 11 चौकारांसह 69, कँपबेलने 2 चौकारांसह 14 आणि ब्रुक्सने 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. विंडीजच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात 52 षटकांत 8 बाद 124 धावा जमविल्या. विंडीजचा संघ अद्याप 336 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडतर्फे जेमीसनने 34 धावांत 5 तर साऊदीने 29 धावांत 3 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून न्यूझीलंडचा संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव 114 षटकांत सर्वबाद 460 (निकोल्स 174, वेग्नर नाबाद 66, यंग 43, मिचेल 42, वेटलिंग 30, लेथम 27, ब्लंडेल 14, टेलर 9, जेमीसन 20, साऊदी 13,बोल्ट 6, गब्ा्रियल 3-93, जोसेफ 3-109, होल्डर 2-110, चेस 2-54).
विंडीज प. डाव- 52 षटकांत 8 बाद 124 (ब्लॅकवूड 69, कँपबेल 14, ब्रुक्स 14, जेमीसन 5-34, साऊदी 3-29).