वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
सध्या विंडीजचा संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर आला असून उभय संघात टी-20 मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. विंडीजचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर शुक्रवारी या संघातील सर्व खेळाडूंची तसेच प्रशिक्षक वर्गाची दुसऱयांदा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये संपूर्ण संघ निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
ख्राईस्टचर्चच्या बाहेरील परिसरात असलेल्या लिन्कन विद्यापीठ परिसरात विंडीज संघाला तसेच त्यांच्या प्रशिक्षक वर्गाला दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सहा दिवसांपूर्वी विंडीज संघाचे न्यूझीलंडमध्ये आगमन झाले. पुढील आठवडय़ात विंडीज संघातील सर्व खेळाडूंची आणि प्रशिक्षक वर्गाची तिसरी आणि शेवटची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.
27 नोव्हेंबरला ऑकलंडमध्ये उभय संघातील पहिला टी-20 सामना खेळविला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना माऊंट माँगेनुई येथे अनुक्रमे 29 आणि 30 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. या टी-20 मालिकेनंतर यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी हॅमिल्टनमध्ये 3 ते 7 डिसेंबर तर दुसरी कसोटी 11 ते 15 डिसेंबर दरम्यान वेलिंग्टनमध्ये खेळविली जाईल. विंडीज संघातील 7 खेळाडू सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. विंडीजच्या टी-20 संघाचा कर्णधार केरॉन पोलार्ड, कसोटी संघाचा कर्णधार होल्डर, ऍलेन, हेतमेयर, किमो पॉल, निकोलस पुरन आणि ओशेन थॉमस हे आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळत आहेत. 10 नोव्हेंबरला आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर हे खेळाडू न्यूझीलंडमध्ये दाखल होतील.