कराड :
गुरूवारपासून लॉकडाऊन होणार असल्याने सैरभर झालेल्या नागरिकांनी अक्षरश: खरेदीचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपासून कराडच्या बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळाले. शहरासह ग्रामीण भागातील हजारो लोक गुरूवारी वाहने घेऊन खरेदीसाठी बाहेर पडल्याने शहरातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक जाम झाली होती.
वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी गुरूवारपासून जिल्हय़ात लॉकडाऊन जाहीर केला आहे. वास्तविक 17 ते 26 जुलै दरम्यान लॉकडाऊन असला तरी 22 तारखेनंतर सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत जीवनावश्यक सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी लॉकडाऊनच्या धास्तीने गेली दोन दिवसांपासून शहरात खरेदीसाठी गर्दी केली आहे. बुधवारचा दिवस गर्दीचा गेल्यानंतर गुरूवारही गर्दी होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी नियोजनही केले होते. मात्र अपेक्षापेक्षा जास्त गर्दी झाल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली.
सहा दिवस पूर्ण टाळेबंदी आणि चार दिवस अंशत: लॉकडाऊन असे जाहीर केले असतानाही लोकांनी वर्षभर टाळेबंदी होणार असल्याप्रमाणे किराणा व अन्य साहित्याची खरेदी केली आहे. शहरासह तालुक्यातील लोकांचे लोंढे खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याने बाजारपेठेला दिवाळीचे स्वरूप आले होते. दिवाळीच्या खरेदीपेक्षाही जास्त गर्दी गुरूवारी पहायला मिळाली. किराणा दुकानात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीच्या गुरूवारी तीन तेरा वाजल्या.
मंडईसह सर्व रस्त्यांवर भाजी विक्री
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने कराडला गुरूवारी व रविवारी भरणारे दोन्ही आठवडी बाजार बंद केले आहेत. गुरूवारी मात्र मुख्य मंडईसह शहरातील सर्व रस्त्यावर भाजी मंडई भरल्याचे पाहावयास मिळाले. पांढरीचा मारूती मंदिरापासून कमानी मारूती मंदिराकडे गेलेल्या रस्त्यावर भाजी मंडई भरल्याने व खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याने या रस्त्यावर कोंडी झाली होती. तर मंडई परिसरतील सर्व रस्त्यावर मंडई भरल्याने या परिसरातही कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
दारूच्या दुकानांत रांगा
लॉकडाऊनच्या काळात सहा दिवस दारूची दुकाने बंद रहाणार असल्याने लोकांनी दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावल्याल होत्या. सहा दिवस पूर्ण लॉकडाऊन असले तरी लोकांनी दहा ते पंधरा दिवसांचा दारूचा साठा केल्याचे पाहावयास मिळाले.