पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची यादगार सांगता
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
तरंगिणी प्रतिष्ठान आयोजित स्व. पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात रविवारी संगीत श्रोत्यांना एकापेक्षा एक अशा सरस मैफलींचा रसास्वाद घेतला आला. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या मा. दत्ताराम नाटय़गृहात सुरु असलेल्या या संगीत महोत्सवाची यादगार सांगता झाली. दुसऱया दिवसाची पहिली मैफल पं. अभिषेकीबुवांचे ज्येष्ठ शिष्य मुंबईस्थीत गोमंतकीय गायक रघुनाथ फडके यांनी सादर केली. राग वक्री तोडी त्यांनी पेश केला. शिस्तबद्ध आलापी, बंदिशीची रितसर मांडणी, सुयोग्य बढत तसेच रागानुकुल घटकांचा समन्वय साधत रागाचे भावमय स्वरुप त्यांनी स्पष्ट केले.
आलापी मैफल यथायोग्य जुळवीत पं. अभिषेकींची ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’ हे भक्तीगीत गाऊन त्यांनी आपली मैफल आटोपली. विठ्ठल खांडोळकर यांनी त्यांना संवादिनीवर तर दत्तराज शेटये यांनी तबल्यावर दमदार साथ केली.
शैलेश गावकर यांचे दमदार तबलावादन
पुढच्या सत्रात गोमंतकीय तबलीये प्रा. शैलेश गावकर यांनी आपल्या सफाईदार एकलवादनाने श्रेत्यांना आनंद दिला. तीन तालातील बंदिश त्यांनी वितृतपणे वाजवली. तबलावादनातील उन्नत बोल, विविध रचना, रेले, विविध कायदे, घराण्याच्या बंदिशी आदी बारकाव्यांची स्वतंत्र एकलवादनात उकल करीत त्यांनी आपली मैफल उठावदार बनवली. श्रोत्यांकडून त्यांच्या वादनाचे टाळय़ांच्या गजरात कौतूक झाले. संवादिनीवर दत्तराज म्हाळशी यांनी लेहेरा वाजवून त्यांना साथ केली.
कल्याणी देशपांडे यांचे अप्रतिम सतारवादन
त्यानंतरच्या सत्रात कल्याणी देशपांडे यांचे सतारवादन झाले. आपल्या मैफलीसाठी त्यांनी राग शुद्धसारंग निवडला. अतिशय प्रभावी असा हा राग त्यांनी खूप तल्लीनतेने आणि समरसतेने पेश केला. रागातील वैशिष्टय़पूर्ण जागा आणि सौंदर्यस्थळे यांचा वेध घेत केलेले त्यांचे सतारवादन खूपच परिणामकारक आणि रसाविष्कार साधणारे ठरले. उदय कुलकर्णी यांनी त्यांना तबल्यावर तोलामोलाची साथ केली.
सकाळच्या चौथ्या सत्रात डॉ. मंजुषा पाटील यांची बहारदार मैफल झाली. मनोहारी स्वरलगाव, उचित ठेहराव, परिपक्व कंठक्रिया यामुळे त्यांचे गाणे रंगतदार झाले. सुरुवातीला वृदांवनी सारंग रागातील विलंबित बंदिश त्यांनी विस्ताराने आळवली. पुढे राग हिंडोली गाऊन त्यांनी आपली मैफल आटोपती घेतली. त्यांच्या मैफलीतून रसानंदाची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. त्यांना संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर यांनी तर तबल्यावर अमर मोपकर यांनी समर्पक साथसंगत केली.
दुपारच्या सत्रात पुण्यातील युवा आणि प्रतिथयश गायक सौरभ काडगावकर यांनी राग भिमपलास अतिशय तयारीने पेश केला. सुरातील गोडवा, तालाची प्रमाणबद्धता, रागप्रक्रियेतील सुसूत्रता आणि सुयोग्य उपज यामुळे त्यांचे गाणे रंगतदार झाले. रसिकांच्या आग्रहास्तव पं. अभिषेकीबुवांनी संगीत दिलेले ‘सूरत पिया कीन धीन बिसुराए’ हे कटय़ारमधील नाटय़गीत आणि बुवांनी गायिलेले ‘आम्हा नकळे ज्ञान’ हे भक्तीगीत पेश करुन त्यांनी आपली सुरेश मैफल आटोपती घेतली. त्यांना संवादिनीवर उदय कुलकर्णी यांनी तर तबल्यावर दयेश कोसंबे यांनी साथ केली.
वदर बेडेकर यांचा नृत्याविष्कार
गोमंतकीयस्थीत नृत्यांगना वरदा बेडेकर यांचा कथक नृत्याचा आविष्कार या सोहळय़ात रसिकांना पाहण्याच्या योग आला. मनोहारी आणि सफाईदार पदलालित्य आणि ध्वनीमुद्रित संगीताच्या वातावरणात पदन्यास, मुदाभिनय, विविध हस्त मुद्र आणि नर्तनासाठी अनुकुल कौशल्यानचे दर्शन घडवित त्यांनी रसिकांची मने जिंकली. एक उत्तम नृत्य मैफल त्यांनी या महोत्सवात सादर केली.
गायन क्षेत्रातील बुजुर्ग कलावंत अजय पोहनकर यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांनी ‘की बोर्ड’ वादन केले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग बागेश्री वाजवून त्यांनी की बोर्डवरील आपले प्रभुत्त्व दाखविले. की बोर्डच्या प्रगत वादन संस्कारातून सादर झालेले त्यांचे हिंदुस्थानी रागदारीवादन रसिकांच्या कुतुहलाचे आणि आकर्षकणाचे कारण ठरले. त्यांना तबल्यावर मयांक बेडेकर यांनी साथसंगत केली.
देवकी पंडित यांचे श्रवणीय गायन
शेवटच्या सत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्या व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचे श्रवणीय गायन झाले. त्यांनी खमाज थाटातील राग झिंझोटी हा षाढव संपूर्णवक्र जातीचा राग विस्ताराने आळविला. निकोप स्वरलगाव, लालित्यपूर्ण बढत, नजाकतदार आलापी, प्रभावी सरगम आणि सुसंगत तेवढीच आकर्षक तानबाजी यामुळे त्यांच्या गाण्याने विशिष्ट उंची गाठली. त्यांना तबल्यावर अमर मोपकर तर संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमात गोव्यातील प्रसिद्ध तबलावादक दयानिधेश कोसंबे यांचा तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे. पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.