वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार मंगळवारी दुसऱया दिवशी सलग तेजीसह बंद होण्यात यशस्वी ठरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक अनुक्रमे 477, 147 अंकांच्या वाढीसह बंद झाले आहेत. एशियन पेंटस, सन फार्मा, महिंद्रा आणि महिंद्रा, एनटीपीसी, टायटन, रिलायन्स यांच्यासह काही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी दमदार कामगिरी मंगळवारी बाजारात नोंदवली.
बीएसई सेन्सेक्स निर्देशांक मंगळवारी सरतेशेवटी 477 अंकाच्या वाढीसह 57,897 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 147 अंकांच्या वाढीसह 17,233 अंकांवर बंद झाला. मंगळवारी सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 331 अंकांच्या वधारासह 57,751 अंकांवर खुला झाला. याने दिवसभरात एकावेळी 57,952 अंकांची वरची पातळी गाठली होती. सेन्सेक्समधील 28 समभाग तेजीसह बंद झाले. तेजीत राहणाऱया कंपन्यांच्या समभागांमध्ये एचसीएल टेक, एशियन पेंटस्, सनफार्मा, महिंद्रा आणि महिंद्रा, अल्ट्राटेक आणि टायटन यांचा सहभाग होता. यांचे समभाग प्रत्येकी 2 टक्के इतके वाढलेले दिसले. फक्त पॉवरग्रिड कॉर्प आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मात्र घसरणीत होते.
बीएसईवर 757 समभागांमध्ये अप्पर सर्किट लागले होते तर 93 समभागांना लोअर सर्किट लागले होते. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 263.52 लाख कोटी रुपयांवर पोहचले. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने 17,250 चा उच्चांकी स्तर गाठला होता. निफ्टीतील 50 पैकी 48 समभाग तेजीसह तर 2 समभाग घसरणीसह बंद झाले. ऑटो, आयटी निर्देशांक 1 टक्के इतका वाढला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1038 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री 27 डिसेंबरला केली आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 955 कोटींचे समभाग खरेदी केले. विदेशी बाजारात अमेरिकेतील नॅसडॅक तेजीसह कार्यरत होता. त्याचप्रमाणे आशियाई बाजारांचा कल पाहिल्यास निक्की, हँगसेंग, कोस्पी, शांघाई कम्पोझीट बाजार तेजीत कार्यरत होते.