न्यूझीलंड अ संघाचा 29 धावांनी विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे झालेल्या दुसऱया अनधिकृत वनडे सामन्यात न्यूझीलंड अ संघाने भारत अ संघावर 29 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना यजमान किवीज संघाने 50 षटकांत 7 बाद 295 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाला 9 बाद 266 धावापर्यंत मजल मारता आली. किवीज संघाने हा सामना 29 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा व निर्णायक सामना दि. 26 रोजी होईल.
सुरुवातीला भारतीय कर्णधार मयांक अगरवालने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रविंद्रला तिसऱयाच षटकांत मोहम्मद सिराजने बाद करत यजमान संघाला पहिला धक्का दिला. ग्लेन फिलिप्स (13), टॉम ब्रुस (17), टॉम ब्लंडेल (0) हे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने किवीज संघाची 4 बाद 96 अशी स्थिती झाली होती. पण, जॉर्ज वर्करने शानदार शतकी खेळी साकारत संघाचा डाव सावरला. त्याने 144 चेंडूत 12 चौकार व 6 षटकरासह 135 धावांची दमदार खेळी साकारली. त्याला जिमी नीशम (33) व मॅकोचे (56) यांनी चांगली साथ दिली. यामुळे किवीज संघाला निर्धारित 50 षटकांत 9 बाद 295 धावापर्यंत मजल मारता आली.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ (2) स्वस्तात बाद झाला. यानंतर, ऋतुराज गायकवाड (17) व कर्णधार मयांक अगरवाल (37) यांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. इशान किशन (44), विजय शंकर (41), कृणाल पंडय़ा (51) यांनी थोडाफार प्रतिकार केला पण त्यांना इतर फलंदाजांची समायोचित साथ न मिळाल्याने भारत अ संघाला 9 बाद 266 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड अ 50 षटकांत 7 बाद 295 (वर्कर 135, जिमी नीशम नाबाद 33, मॅकोचे नाबाद 56, इशान पोरेल 3/50, मोहम्मद सिराज 2/73).
भारत अ 50 षटकांत 9 बाद 266 (मयांक अगरवाल 37, इशान किशन 44, कृणाल पंडय़ा 51, जेमिसन 2/69, डफी 2/35, नीशम 2/24).