सेन्सेक्स 663 अंकांनी मजबूत- निफ्टी 17 हजारांच्या उंचीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजाराने चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी पुन्हा उच्चांकी झेप घेतली आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजाराचा चढता आलेख कायम राहिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स मंगळवारी 663 अंकांनी वधारुन प्रथमच 57,000 वर झेपावत बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये सकारात्मक वातावरण राहिल्याने भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि टीसीएसचे समभाग लाभात राहिले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेन्ट्स, टायटन, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्सने 662.63 अंकांच्या मजबूतीने निर्देशांक 57,552.39 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 201.15 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,132.20 वर स्थिरावला आहे.
निधी जमा करण्याबाबतचे कारण स्पष्ट झाल्याने व शुल्कदरात वृद्धी होण्याच्या संकेतामुळे भारती एअरटेलवर गुंतवणूकदारांची नजर राहिली होती. यासह मध्यम व लहान कंपन्यांच्या समभागात नफा वसूली झाल्याची माहिती आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग, टोकीओ आणि सियोल हे लाभात राहिले आहेत. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता.
जागतिक संकेताचा प्रभाव
जागतिक वातावरण अनुकूल राहण्यासोबत विविध क्षेत्रांमध्ये लिलाव कायम राहिल्याने बाजाराला गती प्राप्त झाली आहे. सर्व प्रमुख निर्देशांक लाभात राहिले आहेत.
प्रमुख क्षेत्राची भरारी
धातू, आर्थिक क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांमध्ये सुधारणात्मक स्थिती राहिल्याचा लाभ हा भारतीय शेअर बाजाराला घेण्यात यश आले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.