कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
दुसऱ्या डोसला झालेला उशीर, डोससाठी रांगा अन् त्यातून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग सक्रीय झाला आहे. त्यातूनच पहिला, दुसरा डोस घेणाऱयांची केंद्रावरच स्वॅब तपासणी करून लाभार्थ्यांना डोस देण्यात येत आहे. मंगळवारी सिद्धार्थनगर नागरी आरोग्य केंद्रांवर याच पद्धतीने सुमारे 300 लाभार्थ्यांना दुसरा डोस देतानाच त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. सोमवारीही शहरातील काही केंद्रांवर याच पद्धतीने लसीकरण झाले आहे.
शहरात महापालिका क्षेत्रात 11 नागरी आरोग्य केंद्रंावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचा पाचवा टप्पा सुरू आहे. 18 वर्षांवरील लाभार्थ्यांना पहिला डोस मंगळवारी देण्यात आला. यादरम्यान, डोस देतानाच काहींची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. मंगळवारी पंचगंगा हॉस्पिटल व सिद्धार्थनगर येथील नागरी आरोग्य केंद्रांवरही दुसऱया डोससाठी ही मोहीम राबवण्यात आली. महापालिका आरोग्य विभागाने हे चांगले पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
पंचगंगा हॉस्पिटल लसीकरण केंद्रावरील रांगेत काही जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे लसीकरणाला होणाऱया गर्दीतून होणारा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावरच कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ज्या केंद्रावर पहिला डोस घेतला आहे, त्याच केंद्रावर दुसरा डोस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रावर दुसऱया डोससाठी रांगा लागत आहेत. मंगळवारी भर पावसात सिद्धार्थनगर येथील आरोग्य केंद्रांसह अन्य नागरी आरोग्य केंद्रांवरही पहाटेपासून दुसऱया डोससाठी रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, पहिले काही लाभार्थी सोडले तर दुसऱया डोससाठी आलेल्या सर्वच लाभार्थ्यांची ऍटीजेन टेस्ट केली. तसेच त्यांचे स्वॅबही घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यात आला. फक्त व्याधीग्रस्तच नव्हे तर सर्वच लाभार्थीची कोरोना टेस्ट केल्याने रांगेतून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य विभागाला यश येणार आहे. सिद्धार्थनगर नागरी आरोग्य केंद्राच्या पद्माराजे शाळा लसीकरण केंद्रावर मंगळवारी 300 जणांना दुसरा डोस देण्यात आला. याचवेळी त्यांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
शहरातील 11 नागरी आरोग्य केंद्रांवर मंगळवारी दुसऱया डोससाठी लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. यापुर्वी रांगेतील गोंधळ, वादावादीमुळे फोन केल्यानंतरच लस अशी मोहीम आरोग्य विभागाने राबवली होती. मधल्या काळात लस तुटवडÎामुळे काही जणांचा 90 दिवसांचा कालावधी उलटला होता. त्यांनाही लसची प्रतीक्षा होती. त्यातूनच ऍडीबॉडी तयार न झालेल्या लाभार्थ्यांत संशयित लक्षणे असण्याचा धोका होता. त्यामुळेच आरोग्य विभागाने लस घेण्यापुर्वी कोरोना टेस्टची मोहीम हाती घेतली आहे.