बॅडमिंटन इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असणाऱया सुपर डॅनच्या पर्वाची सांगता
बीजिंग / वृत्तसंस्था
चीनचा महान बॅडमिंटनपटू लिन डॅन याने शनिवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि इथे त्याच्या दोन दशकांच्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता झाली. बॅडमिंटन इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असणारा लिन डॅन हा ऑलिम्पिक जेतेपद कायम राखणारा एकमेव आहे. सुपर डॅन या टोपण नावाने त्याला ओळखले गेले.
‘मी आता 37 वर्षांचा आहे आणि काही दुखापती, वयानुसार मंदावणाऱया हालचाली यामुळे आणखी संघर्षमय खेळ साकारु शकत नाही, याची मला जाणीव आहे. आणखी खेळू शकणार नाही, कोर्टवर उतरता येणार नाही, या जाणिवेने मन विषण्ण झाले आहे. पण, ही वस्तुस्थिती प्रत्येक खेळाडूला स्वीकारावी लागते आणि मी ही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आगामी कालावधीत मी माझ्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ इच्छितो. कारण, या दोन दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात ही कसर माझ्याकडून राहिली होती. सातत्याने स्पर्धा, प्रवास यामुळे मी माझ्या कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकलेलो नाही’, असे लिन डॅनने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना नमूद केले.
‘बॅडमिंटनवर मी मनापासून मेहनत घेतली, स्वतःला या खेळाप्रती समर्पित केले. चार ऑलिम्पिक चळवळीत सहभागी झालो. पण, त्यावेळी कोणत्याही वळणावर खेळणे थांबवावे, असे वाटले नव्हते. मी स्वतःच्या मनावर एकच शब्द बिंबवत गेलो, तो म्हणजे सातत्य. प्रत्यक्ष खेळून झाल्यानंतर यापुढे मी नव्या स्पर्धेचा विचार करेन’, असे लिन डॅन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला.
‘एखाद्या युवा खेळाडूप्रमाणे मानांकनाच्या मागे धावण्याऐवजी एखाद्या प्रगल्भ खेळाडूप्रमाणे खिलाडूवृत्तीवर भर देण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. मला नेहमी प्रेरणा देणाऱया माझ्या प्रतिस्पर्ध्यांचा मी विशेष आभारी आहे’, असेही लिन डॅनने याप्रसंगी नमूद केले.
पूर्ण कारकिर्दीत उत्तम वरचष्मा गाजवणाऱया या दिग्गज खेळाडूला फक्त शेवटच्या टप्प्यातच बरेच झगडावे लागले. या कालावधीत त्याचे जागतिक मानांकन अगदी 19 पर्यंत खाली घसरले आणि राष्ट्रीय सहकारी शी युकी व चेन लाँग अतिशय तगडय़ा फॉर्ममध्ये असल्याने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे देखील त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरले असते, असे चित्र होते.
‘2000 ते 2020 या कालावधीतील प्रवास माझ्यासाठी उत्तम राहिला आणि आता आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला अलविदा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मागील दोन दशके जो खेळ माझा अक्षरशः श्वास होता, त्या खेळाला निरोप देणे अतिशय कठीण ठरत आहे’.
-चीनचा लिन डॅन
दृष्टिक्षेपात सुपर डॅन
पूर्ण नाव : लिन डॅन
जन्म :14 ऑक्टोबर 1983
खेळण्याची शैली : डावखुरा
सर्वोच्च मानांकन : 1 (26 फेब्रुवारी 2004)
सध्याचे मानांकन : 19
वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपदे : 5
ऑल इंग्लंड जेतेपदे : 6
एकेरीतील जेतेपदे : 666
प्रतिस्पर्धी ली चोंग वेईकडून विशेष कौतुक
मलेशियाचा दिग्गज बॅडमिंटनपटू व लिन डॅनचा सर्वात तगडा प्रतिस्पर्धी ली चोंग वेई याने लिन डॅनच्या खेळाचे विशेष कौतुक केले. बॅडमिंटन इतिहासातील अव्वल दर्जाचे सामने पाहिले तर त्यात ली चोंग वेई व लिन डॅनच्या लढतींचा प्रामुख्याने उल्लेख होत आला आहे. विशेषतः मागील दशकभराच्या कालावधीत या उभयतात वर्चस्व गाजवण्यासाठी बराच संघर्ष रंगला व उभयतांनीही अव्वल दर्जाचा खेळ साकारला आहे. यापैकी ली चोंग वेई हा वर्षभरापूर्वीच निवृत्त झाला.