वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावासाच्या काही कर्मचाऱयांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे नाराज काही कर्मचाऱयांनी नोकरीच सोडून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी सर्बियातील कर्मचाऱयांनी देखील अशीच तक्रार केली होती. दूतावासाने स्वतःच्या ट्विटर हँडलवरच याची माहिती देत इम्रान खान सरकारला लक्ष्य केले होते. कतारमधील पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱयांचेही वेतन झाले नसल्याचे समजते.
अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाकडील निधी संपला आहे. दूतावासाकडे स्वतःच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. राजदूत कशाप्रकारे तरी स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असले तरीही ते कधीपर्यंत हे करू शकतील हा यक्षप्रश्न आहे. लवकरच पाकिस्तानच्या आणखीन काही देशातील दूतावासांमधूनही अशीच स्थिती समोर येणार असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब किंवा दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.
4 महिन्यांपासून वेतन नाही
पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱयांना जुलैमध्ये अखेरचे वेतन मिळाले होते. हे कर्मचारी सुमारे 10 वर्षांपासून काम करत होते. यातील काही कर्मचाऱयांनी राजीनामा दिला आहे. परंतु दूतावास किंवा अन्य अधिकारी याविषयी बोलणे टाळत आहेत.
सर्बियातही ‘हेच’ घडले
सर्बियामधील पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर वेतनाची मागणी करत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. यात इम्रान खान यांचा नारा ‘आपने घबराना नहीं’चे मीम आणि पॅरोडी वापरण्यात आली होती. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने मुलांना शाळेतून काढावे लागल्याचे कर्मचाऱयांनी म्हटले होते.