मलिकवाड येथील घटना : युवक खानापूर तालुक्यातील हारुरी येथील
वार्ताहर /मलिकवाड
फरशी कटिंगच्या कामासाठी दत्तवाड येथे आलेल्या व बुधवारी दूधगंगा नदीत कपडे धुण्यास गेल्यानंतर पोहताना भोवऱयात सापडून 26 वर्षीय युवक बुडाला. सदर घटना मलिकवाड-दत्तवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर बुधवारी सकाळी घडली. राहुल बळीराम शिवठणकर (रा. हारुरी, ता. खानापूर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
दत्तवाड (ता. शिरोळ) येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले चुलते अनंत शिवठणकर यांच्याकडे राहुल चार दिवसांपूर्वीच राहण्यास गेला होता. चुलते अनंत यांनी चंदूर (ता. चिकोडी) येथे घराचे काम घेतले होते. फरशी कटिंगच्या कामासाठी त्याला बोलावून घेण्यात आले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राहुल दसऱयानिमित्त काकासोबत अंथरुण धुण्यासाठी मलिकवाड दूधगंगा नदीवर गेला होता. अंथरुण धुऊन झाल्यानंतर काका अंथरुण ठेवण्यास दत्तवाडला गेले होते. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत पोहण्यास गेला. त्याचे मित्र आंघोळ करून जवळच असलेल्या मसोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. राहुल एकटाच पोहत होता. पोहतेवेळी अचानक पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने तो पुलापलीकडील भोवऱयात अडकला. पाण्यात गुदमरून बुडत असल्याचे नजीकच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र भोवऱयात सापडल्याने नागरिकांना त्याला पाण्यातून बाहेर काढता आले नाही.
या घटनेची माहिती समजताच सदलगा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखल होऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही. दरम्यान, कुरुंदवाड येथील पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या दलाला पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.