मात्र लॉकडाऊनमुळे बंदी असल्याने पर्यटकांचा झाला हिरमोड
वार्ताहर / रामनगर
सह्याद्रीच्या डोंगरातून वाहणाऱया दूधसागर धबधब्याने आता रौद्ररुप धारण केले आहे. पावसाला सुरुवात होताच रौद्ररुप धारण केले असून सदर धबधब्याचा मोह पर्यटकांना खेचून घेत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी असली तरी अनेक पर्यटक रेल्वेतून दूधसागर धबधब्याचा आनंद घेत छायाचित्रे घेत आहेत. बऱयाच जणांना मोह न आवरल्याने दूधसागर स्थानकावर उतरून धबधब्याजवळ जात आहेत.
धबधबा कर्नाटकातील जोयडा डिग्गी या गावांतून उगम पावून कुवेशी येथून डोंगराळ भागातून ओसंडताना दिसतो. कर्नाटक-गोवा सीमेलगतचा हा धबधबा कॅसलरॉक स्थानकापासून 13 कि.मी. अंतरावर आहे. या मार्गावरून जाताना अनेक लहान-मोठे धबधबे व 10 बोगदे पहायला मिळतात. दूधसागर स्थानकावरून 11 वा बोगदा मात्र पायीच पार करावा लागतो.
या धबधब्याचे फेसाळलेले पांढरेशुभ्र रूप पाहताना मन प्रफुल्लित होते. सदर धबधबा पाहण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात. परंतु येथे सुविधा नसल्याने अनेक पर्यटक तेथपर्यंत पोहचू शकत नाहीत. लॉकडाऊन खुला झाल्यावर हा धबधबा सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे. सदर धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी परवानगी मिळाली तर बेरोजगार लोकांनाही रोजगार मिळेल.