‘वर्क फ्रॉम होम’साठी काम करणाऱयांना फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोक घरातून काम करीत आहेत. विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लोकांना घरातून काम करण्याचे आवाहनही सरकारकडून केले जात आहे. संपूर्ण देशामध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांनी घरातून काम करणाऱयांना मदत करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत.
भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीने वापरकर्त्यांसाठी विनामूल्य इंटरनेट योजना आणली आहे. या योजनेत एकही रुपया खर्च करावा लागणार नसून, केवळ लँडलाईन कनेक्शन असलेल्या ब्रॉडबँड वापरकर्त्यांना ही योजना देण्यात आली आहे. घरी राहिल्यामुळे लोकांची इंटरनेटची गरज बऱयाच प्रमाणात वाढली आहे. त्यांची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना होम ब्रॉडबँड सर्व्हिसवर दुप्पट डेटा देण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे.
व्होडाफोनकडून 95 रु.चा नवा प्लॅन
व्होडाफोनने बिहार, केरळ, कर्नाटक, चेन्नई, मध्य प्रदेश, मुंबई आणि तामिळनाडू सर्कलमधील वापरकर्त्यांसाठी 95 रुपयांचा नवीन अष्टपैलू प्लॅन बाजारात आणला आहे. आयडिया वापरकर्ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग आणि डेटाचा लाभ देखील दिला जात आहे.