आंबेवाडी ग्रा. पं. च्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱयांवर कारवाईची मागणी
वार्ताहर / हिंडलगा
गोजगे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होऊन देखील आंबेवाडी ग्रा. पं. चे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून गोजगे गावाला सांडपाणी मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याच पाण्याचा वापर नागरिक पिण्यासाठी देखील करीत असतात. जलवाहिनीद्वारे सोडण्यात येणाऱया पाण्याचे व्हॉल्व्ह चक्क गटारीमध्ये आहेत. सदर व्हॉल्व्हमधून गटारीमध्ये तुंबलेले सांडपाणी पाझरत असते. त्यामुळे ग्रामस्थांना सांडपाणी मिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याबाबत आंबेवाडी ग्रा. पं. कडे तक्रार करून देखील अद्यापही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. शिवाय पाणी सोडणारे कर्मचारीही गटारीत सांडपाणी साचलेले असतानाही व्हॉल्व्ह फिरवून पाणीपुरवठा करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी देखील पंचायतीकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी संभाव्य धोका टाळून नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी गावातील पाणी समस्येची त्वरित पाहणी करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. तसेच बेजबाबदार पंचायत अधिकाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.