रायटरच्या मदतीने मिळवले 79 टक्के; रेखा भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
सतीश चव्हाण/ कराड
वय आणि शारीरीक व्यंग शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही. प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते, हे ओगलेवाडी (ता. कराड) येथील अंध महिला रेखा भोसले यांनी दाखवून दिले आहे. पूर्ण दृष्टीहिन असलेल्या रेखा भोसले यांनी वयाच्या 40 व्या वर्षी दहावीची परीक्षा तब्बल 79 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्या आहेत. अंधत्व व हलाखीची परिस्थिती असतानाही केवळ शिक्षणाच्या प्रबळ इच्छाशक्तीवर भोसले यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर बसून कॅलेंडर विकणाऱया अंध रेखा संतोष भोसले या सर्वांच्याच नजरेस पडतात. अंध असतानाही त्यांची जगण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून तहसील व पंचायत समिती कार्यालयात येणारे अनेकजण त्यांच्याकडून कॅलेंडर विकत घेतात. या व्यतिरिक्त त्या दिवाळीत रांगोळी विकतात. तर काहीच काम नसेल, तेंव्हा रेल्वेत फुटाणे व शेंगदाणे विकतात.
रेखो भोसले या त्यांच्या साडेसात वर्षाच्या मुलासह ओगलेवाडी येथे भाडय़ाच्या घरात राहतात. दुर्दैवाचे दशावतार म्हणजे त्या अंध व गरीब असल्याने त्यांना शासनाचे घरकुल मिळाले आहे. पण तेही सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील अर्ध्या टेकडीवर असल्याने त्यांना त्यांच्या घरात जाणे येणे शक्य होत नाही. त्यामुळे भाडय़ाच्या खोलीत राहतात.
भोसले यांना शिक्षणाची प्रबळ इच्छा होती. मी शिकले तर मला कुठेतरी नोकरी मिळेल. माझे वणवण फिरणे थांबेल, यासाठी त्यांना शिक्षण घ्यायचे होते. 22 वर्षापूर्वी सातवी पास झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली होती. मात्र शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील विद्यालय मलकापूर या शाळेत 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. विवाहापूर्वीचे नाव रेखा नामदेव कदम या नावाने त्यांनी फॉर्म भरला.
संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक सदानंद शेवाळे, मुख्याध्यापक जीवन फुके, शिक्षक सचिन चव्हाण, सुधाकर कांबळे, अपर्णा गरूड, कर्मचारी महेंद्र आंबवडे व अशोक साठे यांनी मोठे सहकार्य केल्याचे भोसले यांनी सांगितले. शनिवार व रविवारी शाळेत सरांनी चांगले मार्गदर्शन केले. तर विद्यानगर येथील ओळखीचे शशिकांत पाटील व मीनल पाटील हे दहावीची पुस्तके वाचून दाखवत होते. उर्वरित वेळी घरी ब्रेन लिपी व युटय़ुबवर अभ्यास केला. परीक्षेच्यावेळी रायटर म्हणून नववीच्या वर्गातील सानिका देवकांत हिने मदत केल्याचे भोसले यांनी सांगितले.